ठाणेः ठाण्यात मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि अशावेळी सकाळीच रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विविध मतदान केंद्रांवर मतदार पोहोचले आहेत. ठाणे विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदान बजावल्यानंतर अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, खूप चांगल वातावरण आहे, या पाच वर्षांत ठाणेकरांना आमदार दिसले नाहीत, त्यांनी काही काम केलेली नाहीत, त्यामुळे मतदारांमध्ये एक राग अन् रोष आहे, मतदानासाठी मतदार केंद्रांवर गेलो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. त्यामुळे बदल नक्की होईल, मराठी माणसाच्या विकासासाठी, मराठी माणसाच्या पाठी खंबीर उभे राहण्यासाठी मला मतदान करा, ठाण्यात कुठल्याही प्रकराचं काम झालं नाही.जो माणूस पाच वर्ष दिसला नाही, तो पुढची पाच वर्षं काय काम करणार आहे. नागरिकांनी माझा आवाज बुलंद करण्यासाठी मला मतदान करा. आज पडणारा पाऊस हा राज्यातील घाण आणि महाराष्ट्राला लागलेली धूळ वाहून जाण्यासाठी पडत असल्याचं वक्तव्य करत ठाणेकरांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन अविनाश जाधव यांनी केलं आहे.तर दुसरीकडे पावसाचा जोर कमी असला तरी ठाण्यातील नागरिक आहेत हे मोठ्या प्रमाणात मतदान करतील, असा अंदाज वर्तवला जातोय. सकाळ सकाळीच ठाणे शहर मतदारसंघातील भाजपा उमेदवार संजय केळकर आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या कुटुंबीयांसमवेत यांनी देखील रांगेत उभे राहून मतदान करून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
Maharashtra Election 2019 : महाराष्ट्राला लागलेली धूळ वाहून जाण्यासाठी आज पाऊस पडतोय- अविनाश जाधव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 10:15 AM