- अजित मांडकेठाणे - ठाणे शहर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर हे सलग दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांची लढत ही मनसेचेअविनाश जाधव यांच्याशी होणार आहे. ठाण्यात युतीचे वर्चस्व असले तरी मनसेला आता राष्ट्रवादीचा साथ लाभल्याने येथे या दोघांमध्ये थेट लढत होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे तमाम ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. हा मतदारसंघ शिवसेनेने सुरवातीला मागितला होता. त्यामुळे काही शिवसेनेची ज्येष्ठ मंडळी नाराज झाली होती. परंतु, आता एकनाथ शिंदेच यांनीच या निवडणुकीत लक्ष घातल्याने या नाराजांची नाराजीही दूर झाली आहे.
मनसेकडून अविनाश जाधव हे प्रथमच विधानसभा निवडणूक लढवित आहेत. ठाण्यासह पालघर जिल्ह्याचे नेतृत्व त्यांच्या खांद्यावर आहे. पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. परंतु मतदार त्यांच्यावर कितपत विश्वास टाकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यात मनसेकडून लोकसभा निवडणुक लढली गेली नसली तरी विविध आंदोलनाच्या माध्यमातून मनसे काही अंशी ठाण्यात चर्चेत राहिली आहे.
जमेच्या बाजू
स्वच्छ चेहरा, शांत स्वभाव जनतेच्या सतत संपर्कात असणारे म्हणूनही संजय केळकर यांची ओळख आहे. तसेच जुन्या ठाण्यासह नव्याने तयार झालेल्या सोसायटींमध्येही त्यांना मानणारा एक गट आहे. शिवाय शिवसेनेबरोबर झालेली युती ही सुध्दा त्यांच्यासाठी एक जमेची बाजू मानली जात आहे. सर्वसामान्यांसाठी लढणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. भाजपसह शिवसेनेतील नाराजांची नारजीही आता दूर झाल्याने हा फायदा आहे.
अविनाश जाधव हे मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाप्रमुख आहेत. विविध आंदोलनाच्या माध्यमातून ते सतत चर्चेत राहिल्याचे दिसले आहेत. त्यामुळेच पक्षाने त्यांच्यावर दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. तरुणांना अपेक्षित असलेले नेतृत्व गुण त्यांच्याकडे आहेत. शिवाय आताच्या निवडणुकीत त्यांना राष्टवादीची साथ लाभली असल्याने ही एक जमेची बाजू मानली जात आहे. मराठी-गुजराती वादाला त्यांनी खतपाणी घातले.
उणे बाजू
संजय केळकर हे फारसे आक्रमक नाहीत. सुुशिक्षित मतदार मतदानाला उतरण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत घटले आहे. यावेळी मतदार मतदानाला उतरला तर ठीक अन्यथा त्यांना यंत्रणा राबवावी लागेल. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या नियोजनातील गोंधळावरुन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हजेरी घेतली होती. सभेतील गोंधळाची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये अन्यथा त्याचा त्रास पक्षाला व उमेदवाराला विनाकारण होऊ शकतो.
अविनाश जाधव हे अतिशय आक्रमक म्हणून ओळखले जातात. अतिआत्मविश्वास हा त्यांच्यातील मायनस पॉइंट मानला जात आहे. त्यांचा घात करण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यात राष्ट्रवादीने साथ दिली असली तरी ठाण्यातीन सुजाण मतदारांना ही साथ न पटण्यासारखी आहे. मनसेनी लोकसभा निवडणूक लढवली नसल्याने किती मते पडू शकतात, याचा काहीच अंदाज त्यांना व त्यांच्या पक्षाला आलेला नाही.