मीरारोड - ओवळा माजीवडाचे शिवसेना उमेदवार प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात राहणारे भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी सरनाईकांऐवजी मीरा भाईंदरचे भाजपा उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या मतदार संघात प्रचार करत आहेत. तर मीरा भाईंदर मतदारसंघातील सनेचे नगरसेवक, पदाधिकारीदेखील सरनाईकांच्या मतदार संघात काम करत असल्याने शहरातील भाजपा - शिवसेनेत आलबेल नसल्याचे दिसत आहे. त्यातच सेनेचे काही नगरसेवक तर मेहतांच्या विरोधात काम करुन शिवसेनेतील असलेला रोष व्यक्त करत आहेत. मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघातुन भाजपाने मेहतांना तर ओवळा माजीवडा मधुन शिवसेनेने सरनाईकांना उमेदवारी दिली आहे. परंतु शिवसेना नगरसेवकांसह पदाधिकारी व शिवसैनिकां मध्ये असलेला मेहतांविरोधातला रोष निवडणुकीत जाणवतो आहे. भाजपाच्या बंडखोर माजी महापौर गीता जैन यांच्या उमेदवारी अर्ज भरतेवेळी काढलेल्या शक्तीप्रदर्शनात सेनेचे नगरसेवक कमलेश भोईर उघडपणे जीपवर होते. याशिवाय सेनेचे नगरसेवक दाम्पत्य राजू व भावना भोईर यांनी देखील गीता यांना त्यावेळी भेटून शुभेच्छा दिल्या होत्या.निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून सरनाईकांच्या मतदारसंघातील भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी सेना उमेदवाराचा प्रचार न करता शेजारच्या मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघात मेहतांच्या प्रचाराला लागले आहेत. त्यांना प्रभाग निहाय जबाबदारी देण्यात आली असून सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांना मेहतांच्या प्रचार व नियोजनाचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे सेनेच्या उमेदवारासाठी भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी एखाद्या रॅलीवेळी वगैरे क्वचितच दिसत आहेत. तशीच स्थिती मीरा भाईंदर मतदारसंघातील आहे. मेहतांच्या प्रचाराऐवजी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक हे ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघात सरनाईकांच्या प्रचारात गुंतलेले आहेत. काही रॅली, पदयात्रेत अपवादात्मकवेळी सेनेचे पदाधिकारी भाजपाच्या नगरसेवक, पदाधिकाराऱ्यांसोबत दिसत आहेत. शिवसेना वा भाजपाकडूनदेखील याबद्दल फारसे गांभीर्याने घेतले जात नसून दुसऱ्यांपेक्षा आपल्याच पक्षाच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांवर उमेदवारांनी जास्त विश्वास दाखवल्याचे सांगितले जातेय. तसे असले तरी शिवसेनेतील भाजपाच्या मेहतां बद्दलचा संतापदेखील याला कारण असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सरनाईकांच्या मतदारसंघात जुने उद्योग तोडण्यावरुन मेहता व त्यांच्यात टोकाचा वाद झाला होता. त्यावेळी मेहतांनी सरनाईकांना पाडण्याचा इशारा दिला होता. सरनाईकांसह सेनेच्या नगरसेवकांची कामे व निधी रोखणे आदी प्रकार केले गेले. बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या कामास सातत्याने मेहतांनी खोडा घातल्याने सेनेने पालिकेत तोडफोड केली असता, ज्या नगरसेवक - नगरसेविका तोडफोडीत नव्हत्या त्यांनादेखील गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आले. नगरसेवकांच्या घरी पोलीस पाठवले गेले. तोडफोडीनंतर महापौर डिंपल मेहतांसह नरेंद्र मेहतांनी शिवसेना व सरनाईकांवर टिकची झोड उठवली. शिवसेनेच्या रक्तात गुंडगिरी असून भाजपाच्या बळावर सत्ता भोगत आहे असे सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसैनिकांचे संस्कार मेहतांनी काढले होते. निवडणुकीच्या जाहिरात फलकांमध्ये देखील मेहतांनी बाळासाहेबांना स्थान न दिल्याने शिवसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर मेहतांनी फलक बदलून त्यात बाळासाहेबांचे छायाचित्र टाकले. या सर्व प्रकारांमुळे शिवसैनिकांमध्ये मेहतांबद्दल निर्माण झालेला रोष शिवसैनिकांनी जाहीरपणे व्यक्त केला आहे. बाळासाहेबांना त्यातुनच पक्षप्रमुख व शिवसैनिकांचे संस्कार काढून सेनेला त्रास देणाऱ्यांचा प्रचार का म्हणून करायचा ? असा सवाल शिवसैनिक करत आहेत. मेहतांनी त्यांच्या सेव्हन स्क्वेअर शाळेजवळ आयोजित युतीच्या मेळाव्यातदेखील शिवसैनिकांनी आपली ताकद आणि रोष दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मेळाव्याला मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते. सरनाईकांना ठाण्याला जायचे असल्याने ते भाषण आटोपून मेळाव्यातून निघाले असता बहुसंख्य शिवसैनिक देखील खुर्च्या सोडून निघून गेले. खासदार गोपाळ शेट्टी आदींचे भाषण होईपर्यंत जवळपास निम्म्यापेक्षा जास्त मैदान रिकामी झाले होते. या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या सर्व विषयांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. हेमंत म्हात्रे (जिल्हाध्यक्ष, भाजपा) - होय, या बाबत आमदार सरनाईकांनी देखील फोनवरुन सांगितले आहे. लवकरच त्यांच्या मतदारसंघातील भाजपा व शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेणार आहोत. मध्यंतरीच्या काळात भाजपा - सेनेत झालेले वाद संपले असून सर्वजण आता युतीसाठी काम करत आहेत. युतीच्या मेळाव्यानंतर कार्यकर्ते निघून गेले, हे खरे असले तरी सकाळपासून ते कामं करत असल्याने थकले होते. त्यातच सभेला उशीर झाल्याने ते गेले.
Maharashtra Election 2019: युतीतील अजब घोळ; नगरसेवक, पदाधिकाऱ्यांकडून प्रचाराचा बट्ट्याबोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 9:55 PM