ठाणे : ठाण्यात राष्ट्रवादीने खुल्या दिलाने पाठिंबा दिला असताना काँग्रेस यामध्ये मागे होती. शनिवारी मनसेप्रमुखराज ठाकरे यांनीच काँग्रेसच्या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी पाचारण करून मदतीसाठी साद घातल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, आता भाजप किंवा शिवसेनेला मतदान न करता खुल्यादिलाने नाही तर आतून मदत करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज यांनी एका हॉटेलमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी बोलावले होते. काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष कानडे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीने ठाण्यात मनसेला टाळी दिली असताना काँग्रेस तटस्थ का आहे, असा सवाल राज यांनी त्यांना केला होता. यासंदर्भात श्रेष्ठींशी बोलावे, असे काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी स्पष्ट केले. परंतु, ठाण्यात काँग्रेस, भाजप किंवा शिवसेनेला मदत करणार नसल्याचेही या मंडळींनी स्पष्ट केले. असे असताना मग मनसेला मदत का नाही करत, असा सवाल राज यांनी केला. अखेर, आतून काँग्रेस मदत करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.