मीरा रोड - शिवसेना सर्वात विश्वास घातकी पक्ष असून मीरा भाईंदरमधून शिवसेना मुळासकट उखडून टाकण्याचा दम भरणा-या भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांविरोधात शिवसैनिक संतप्त झाले आहेत. पण शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांना संदेश पाठवून मेहतांनी माफी मागितली. भावनेच्या भरात व मानसिक तणावात आपण बोलून गेल्याचे मेहतांनी फोन करून सांगितले, असे खुद्द सरनाईक यांनी म्हटले आहे. तर पिसाळलेल्या कुत्र्याकडे लक्ष देऊ नका, शिवसेना संपवण्याची भाषा करणारे स्वत:च संपले, असे सरनाईक शिवसैनिकांना म्हणाले आहेत.बाळासाहेब ठाकरे कलादालनास विरोध, मेहतांनी उद्धव ठाकरे व शिवसैनिकांचे काढलेले संस्कार आदी कारणांसह सेना नगरसेवक, पदाधिकारी आदीमध्ये विविध कारणांनी मेहतांबद्दल असलेल्या रोषामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी मेहतांना ठरवून धोबीपछाड दिला. त्यामुळे मेहता खवळले असून त्यांनी थेट सेनेला सर्वात मोठी विश्वास घातकी पार्टी म्हणत शहरातून शिवसेना मुळासकट संपवणार, असा दम भरला होता.मेहतांच्या वक्तव्याने सोशल मीडियासह शिवसैनिकांमध्ये निषेध आणि संताप व्यक्त होत होता. नगरसेवक राजू भोईर यांनी तर शिवसेनेला संपवण्याची भाषा करणा-यांना मीरा भाईंदरच्या जागरुक जनतेने आधीच संपवून टाकले आहे. शिवसैनिकांना डिवचणा-यांचे काय होते हे महाराष्ट्राची जनता आणि शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. स्वत:ची खोटी कर्म आणि केलेली पापं याचं प्रायश्चित करा, असा टोला भोईर यांनी लगावला आहे.मेहतांवर शिवसैनिक संतापले असल्याने सरनाईकांनीच समजूत काढली आणि शांत राहण्यास सांगितले. लोकांनीच ज्याला संपवले त्याला नाहक मोठं करू नका, असे सांगतानाच २०२२ पर्यंत मेहतांचं राजकिय अस्तित्व जनता आणि शिवसेना ठेवणार नाही, असे सरनाईक म्हणाले. भले भले शिवसेना संपवण्याची भाषा करणारे संपले. कुत्र्यासारखे हाल झाले. त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याकडे लक्ष देऊ नका, अशी बोचरी टीका त्यांनी केली. मेहतांनीच आपल्या संदेश पाठवून माफी मागितली असून, भावनेच्या भरात बोललो, असे म्हटल्याचे सरनाईकांनी सांगितले. मेहतांनी फोन देखील केला असे ते बोलले.खासदार राजन विचारे यांनी देखील मेहतांचा समाचार घेत शिवसेना संपवण्याची भाषा करण्याची देखील मेहतांची पात्रता नाही असे म्हणाले. लोकांनी तुमची पात्रता दाखवुन दिली असुन स्वत:च्या कर्माचे खापर दुसरायांवर फोडण्या पेक्षा आत्मचिंतन करुन सुधरा असा सल्ला विचारेंनी दिलाय.
पिसाळलेल्या कुत्र्यांकडे लक्ष देऊ नका, प्रताप सरनाईकांनी साधला मेहतांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 8:01 PM