ठाणे : ठाणे शहर मतदारसंघातील पाच उमेदवारांचा फैसला सोमवारी ईव्हीएममध्ये बंद झाला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत या मतदारसंघात अंदाजे ५५.९0 टक्के मतदानाची नोंद झाली. शहराच्या विविध भागांत असलेल्या मतदानकेंद्रांच्या ठिकाणी पावसामुळे चिखल झाला होता.
व्हीव्हीपॅट मशीनमुळे मतदानास विलंब होत असल्याने मतदारांच्या लांबचलांब रांगा लागल्याचे चित्र होते. तर, सकाळच्या सत्रात थोड्या प्रमाणात पावसाची हजेरी दिसून आली. मात्र, त्यानंतर पावसानेही उघडीप घेतली. यामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनीदेखील मतदानासाठी ठिकठिकाणी गर्दी केली होती. एका वृद्धाचे मतदारयादीतून नाव गहाळ झाल्याची घटना वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले.
ठाणे शहर मतदारसंघात खरी लढत ही भाजपचे संजय केळकर विरुद्ध मनसेचेअविनाश जाधव यांच्यातच आहे. यावेळी युती झाल्याने केळकरांना फायदा होणार का, ही चर्चा रंगत आहे. २०१४ च्या निवडणुकीत येथे ५६.५६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २०१४ मध्ये एकूण तीन लाख २२ हजार १६८ मतदारांपैकी एक लाख ८२ हजार २३३ मतदात्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी ८२ हजार ८०६ पुरुष आणि ९९ हजार ४२७ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विशेष म्हणजे पुरुष मतदात्यांच्या तुलनेत १६ हजार ६२१ अधिक महिलांनी मतदान केले आहे. यंदा या मतदारांची संख्या तीन लाख ३७ हजार ९०९ एवढी असून यामध्ये एक लाख ७७ हजार १५४ पुरुष आणि एक लाख ५८ हजार ७२१ स्त्री मतदार आहेत.
दरम्यान, सकाळी ७ वाजता शांततेत मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत ठाणे शहर मतदारसंघात सहा टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर, ११ वाजेपर्यंत येथे सुमारे १८ टक्के मतदान झाले. तर १ वाजेपर्यंत त्यात वाढ होऊन दुपारी ३ वाजेपर्यंत ३८.९१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर, सायंकाळी शेवटच्या तीन तासांत मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी सर्वपक्षीयांची तारेवरची कसरत सुरू होती. अखेरचे वृत्त हाती आले, तेव्हा ठाणे शहरात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ५५.९0 टक्के मतदानाची नोंद झाली.
लोकशाहीचा हा उत्सव आहे, शिवाय लोकशाही समृद्ध करण्यासाठी मतदारांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. नवभारत निर्माण करण्यासाठी आणि त्याच धर्तीवर नवमहाराष्ट्र निर्माण करण्यासाठी मतदार पुन्हा युतीवर विश्वास ठेवून मतदान करतील, असा विश्वास आहे.- संजय केळकर, ठाणे शहर, भाजप, उमेदवार
बदलाचे वारे आहे, पाच वर्षांत आमदार दिसले नाही, पाच वर्षांत त्यांनी काही कामे केली नाहीत. याचा राग मतदारांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यामुळे बदल हा निश्चित होईल. महाराष्ट्रात जी काही धूळ, घाण जमा झालेली आहे, ती साफ करण्यासाठीच पाऊस बरसत असून मतदानातूनही ते चित्र निश्चितच दिसेल.- अविनाश जाधव, ठाणे शहर, मनसे, उमेदवार
शिवसेना, भाजपचे उमेदवार संजय केळकर हे निश्चितच निवडून येतील. देशात आणि राज्यात महायुतीने केलेल्या विकासकामांमुळेच पुन्हा शिवसेना, भाजपचे उमेदवार निवडून येतील. लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.- राजन विचारे, खासदार, ठाणे
ज्येष्ठ नागरिकाचे नाव यादीतून गायब
ठाण्यातील लोकमान्य सोसायटीत राहणारे ओमप्रकाश साबू (८८) हे लोकशाहीचे कर्तव्य बजावण्यासाठी महाराष्टÑ विद्यालय येथे गेले होते. जवळजवळ पाऊण तास ते मतदारयादीत आपले नाव शोधत होते.परंतु, त्यांना ते सापडलेच नाही. विशेष म्हणजे मतदारयादीत त्यांची पत्नी, मुलगा यांची नावे होती. मात्र, त्यांचे नाव नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. अखेर, त्यांना मतदान न करताच परतावे लागले.
संथगतीने मतदान : सकाळी ७ वा.पासून पहिल्या दोन तासांत अवघे सहा टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. व्हीव्हीपॅटमुळे ठिकठिकाणी मतदान करताना मतदात्यांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत होते. त्यामुळेदेखील मतदारांमध्ये काहीशी नाराजी पसरली होती.
पावसातही पर्यायी व्यवस्था : पावसामुळे अनेक मतदानकेंद्रांजवळ चिखल झाला होता. परंतु, यातून मतदान करण्यासाठी येणाºया मतदारांचे हाल होऊ नयेत, यासाठी काही मतदानकेंद्रांच्या ठिकाणी फळ्या, प्लाय टाकण्यात आले होते. त्यामुळे मतदारराजाही काहीसा समाधानी होता.
तळमजल्यावरच मतदानकेंद्र : लोकसभा निवडणुकीतील चूक विधानसभा निवडणुकीत आयोगाकडून दुरुस्त करण्यात आली. त्यानुसार, अनेक शाळांच्या ठिकाणी मतदानकेंद्रे ही तळमजल्यावर आणि पटांगणात मंडप घालून तयार केल्याचे दिसले. त्यामुळे मतदारांची सोय झाली.