- पंकज रोडेकरठाणे : मराठी भाषेच्या नावाने राजकारण करणाऱ्या मनसेने जिल्ह्यातील १८ पैकी १४ मतदारसंघांमध्ये मनसे नेता, सरचिटणीस, ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष, मनसे विद्यार्थी सेना ठाणे जिल्हाध्यक्ष आदी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामधील मनसे नेते, ठाणे जिल्हाध्यक्ष, विद्यार्थी सेना ठाणे जिल्हाध्यक्षांसह दोघांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले प्रतिज्ञापत्र हे चक्क इंग्रजी भाषेत आहे. त्यामुळे या प्रमुख मनसे नेत्यांना मराठी भाषेचा विसर पडल्याचे प्रखरतेने दिसत आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या पक्षांतील उमेदवारांनी प्रामुख्याने मातृभाषेतून प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.विधानसभेला ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, शहापूर, मुंब्रा-कळवा आणि कल्याण पूर्व हे चार मतदारसंघ वळगता इतर १४ मतदारसंघांमध्ये मनसेने उमेदवार दिले आहेत. यामधील नऊ मतदारसंघांतील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना मराठी भाषेत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. ठाणे शहर मतदारसंघाचे उमेदवार व मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, कोपरी-पाचपाखाडीतील महेश कदम, ओवळा-माजिवडामधून मनसे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे, कल्याण ग्रामीणमधून मनसेचे नेते प्रमोद (राजू) पाटील आणि मीरा-भाईंदरमधून हरेश सुतार या उमेदवारांनी इंग्रजी भाषेतच प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामुळे वारंवार मराठी भाषेच्या मुद्यावर राजकारण करणाऱ्या मनसेच्या ठाणे जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख नेतेमंडळींनी मराठी बाणा बाजूला ठरवत इंग्रजीची कास धरल्याचे प्रतिज्ञापत्रांतून दिसत आहे. त्यामुळे यातून नवीन वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.चार उमेदवार दहावी पासठाणे जिल्ह्यातील १४ मतदारसंघांतून मनसेच्या १७ जणांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये भिवंडी पश्चिम येथून दोघांनी, भिवंडी पूर्व येथून तिघांनी, तर अन्य उमेदवारांनी इतर मतदारसंघांतून प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज भरला. त्यातील पाच जणांनी इंग्रजीतून प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यापैकी चौघे दहावी असून, एक जण बीएससी आहे. इंग्रजीतून प्रतिज्ञापत्र सादर करण्याची कारणे त्यापैकी काही उमेदवारांनी विचारली असता, घाईगडबडीत हा प्रकार झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, उमेदवारी अर्ज मराठीतच सादर केला असून, प्रतिज्ञापत्र इंग्रजीत दिल्याचा अर्थ मनसेने मराठीची कास सोडली, असा होत नसल्याचेही या उमेदवारांनी सांगितले.
Maharashtra Election 2019: मराठीचा गजर करणाऱ्या मनसे उमेदवारांची प्रतिज्ञापत्रं इंग्रजीत; म्हणे, घाईगडबडीत झालं!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 12:04 PM