ठाणेः राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या बालेकिल्ल्यात जे मतदान घसरलेलं आहे, ते बरंच बोलकं आहे. शरद पवारांनी जादू केली आणि तरुणाई मतदानासाठी बाहेर पडली आहे. महाराष्ट्रात बदल निश्चित आहे, असा विश्वासही जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला आहे.
मतदान केंद्राच्या बाहेर 500 मीटरच्या अंतरावर वायफाय येताच कामा नये. वायफाय बंद झाले पाहिजेत नाही, तर आम्ही स्वतः जॅमर नेऊन लावू. मतदान केंद्रावरती कुठेही सिग्नल जाता कामा नये. मतमोजणी लगेचच करायला हवी होती, त्याला हे दोन दिवस लावत आहेत. दोन दिवसांत वायफायच्या माध्यमातून छेडछाड करण्याचा प्रयत्न असू शकतो. वायफाय ब्लॉक करावेत अशा सगळ्या उमेदवारांची मागणी आहे. 24 तारखेपर्यंत थांबा, सगळंच कळेल, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे.मतदार याद्यांकडे इलेक्शन कमिशन कधीच गांभीर्यानं पाहत नाही. डिजिटल इंडियाच्या युगातही मतदारांना मतदार यादीत नाव नसल्याचं पाहायला मिळतंय, हे दुर्दैवी आहे. 1947साली देशाला स्वातंत्र्य मिळालं. पहिल्या निवडणुकीत यादी तपासण्याची जी पद्धत होती, तशीच पद्धत 70 वर्षं झाली तरी कायम आहे. 70 वर्षांत काहीही बदललेलं नाही. मतदार याद्यासंदर्भात निवडणूक आयोगानं गांभीर्य दाखवावं. मतदार कार्ड आधार कार्डला लिंक करावं, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.