कल्याण : काँग्रेस, राष्ट्रवादीकडे विकासाची दूरदृष्टी नाही. त्यांच्या सत्तेत केवळ घोटाळे करण्यावरच भर राहिला. त्यांनी दहशतवादाला थारा देत देशाची सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोप करताना, देशाला लुटणाऱ्यांना मतदान करू नका, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी केले.
भाजपचे कल्याण पूर्वेतील उमेदवार गणपत गायकवाड आणि उल्हासनगरचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारार्थ कल्याण पूर्वेत झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भिवंडीचे खासदार कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शिवाजी आव्हाड आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आदित्यनाथ म्हणाले की, काश्मीरला कलम ३७०चा विशेष दर्जा काँग्रेसने दिला होता. त्यास बाबासाहेब आंबेडकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा विरोध होता. मात्र, तरीही काँग्रेसने हे कलम कायम ठेवून दहशतवादाला खतपाणी घातले, परंतु सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम रद्द करून दहशतवाद हद्दपार केला.
भारतात दहशतवादाला थारा नाही, असा संदेश मोदींनी याद्वारे जगाला दिला असल्याचे सांगून, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी असलेल्या दाऊदच्या सहकाºयांशी असलेले संबंध पुढे आल्याचा आरोप त्यांनी केला.काँग्रेसच्या काळात रोज नवीन घोटाळे बाहेर येत होते. समाजहित आणि राष्ट्रहितापेक्षा त्यांच्या नेत्यांनी स्वहिताला महत्त्व दिले. टुजी आणि कॉमनवेल्थ घोटाळा ही त्याची प्रमुख उदाहरणे आहेत. महाराष्ट्रातील सत्ताकाळातही त्यांनी मोठे घोटाळे केले, परंतु देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात एकही घोटाळा झाला नसल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. विकासाला प्राधान्य देणाºया महायुतीला पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.