- नारायण जाधव ठाणे : राज्यातील सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेला मतदारसंघ म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथील एकंदरीत मतदानाच्या टक्केवारीत दिवसेंदिवस घट होतांना दिसत आहे. हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने मतदानाचे प्रमाण वाढावे म्हणून पथनाट्य, मॅरेथॉन स्पर्धांसह चित्रकला, स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांद्वारे जनजागृती केली. मात्र, तरीही यंदाही जिल्ह्यातील १८ पैकी १३ मतदारसंघात मतदानाचे प्रमाण २०१४ च्या तुलनेत अडीच टक्क्यांनी घटले आहे.
अगदी अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाशी तुलना केली तरी विधानसभेकरिता मतदानात दीड टक्के घट झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ८.९६ टक्क्यांची घसरगुंडी ऐरोली मतदारसंघात झाली आहे. गेल्या वेळच्या तुलनेत सर्वात कमी घट शहापूर मतदारसंघात ०.९० टक्के आहे. विशेष म्हणजे सर्वच मतदारसंघात गेल्या खेपेपेक्षा मतदारांची संख्या वाढूनही मतदानाच्या टक्केवारीत ही गंभीर घट झाली आहे. जिल्ह्यात मतदानात वाढ झालेल्या पाच मतदारसंघात सर्वात चांंगली वाढ उल्हासनगरात ८.६७ टक्के इतकी आहे.
मतदारसंघ २०१४ २०१९ घट/वाढ१३४ भिवंडी ग्रामीण ६६.२४ ५९.६० ६.६४ टक्के घट१३५ शहापूर ६५.७० ६४.८० ०.९० टक्के घट१३६ भिवंडी पश्चिम ४९.५८ ५०.३२ ०.७४ टक्के वाढ१३७ भिवंडी पूर्व ४४.३० ४७.८१ ३.५१ टक्के वाढ१३८ कल्याण पश्चिम ४४.९२ ४१.७४ ३.१८ टक्के घट१३९ मुरबाड ६३.१७ ५८.३६ ४.८१ टक्के घट१४० अंबरनाथ ३९.७१ ४२.३२ २.६१ टक्के वाढ१४१ उल्हासनगर ३८.२२ ४६.८९ ८.६७ टक्के वाढ१४२ कल्याण पूर्व ४५.१९ ४३.५५ १.६४ टक्के घट१४३ डोंबिवली ४४.७४ ४०.७२ ४.०२ टक्के घट१४४ कल्याण ग्रामीण ४७.९४ ४६.३७ १.५७ टक्के घट१४५ मीरा-भार्इंदर ५२.६६ ४८.३८ ४.२८ टक्के घट१४६ ओवळा-माजीवडा ५०.३१ ४२.९७ ७.३४ टक्के घट१४७ कोपरी-पाचपाखाडी ५३.१० ४९.०९ ४.०१ टक्के घट१४८ ठाणे ५६.५६ ५२.४७ ४.०९ टक्के घट१४९ मुंब्रा-कळवा ४७.४८ ४९.९६ २.४८ टक्के वाढ१५० ऐरोली ५१.४७ ४२.५१ ८.९६ टक्के घट१५१ बेलापूर ४९.६९ ४५.१६ ४.५३ टक्के घट
स्थलांतरित कामगारांमुळेही मतदानाचे प्रमाण कमीठाणे : जिल्ह्यातील ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदारांपैकी अवघे ४७.९१ टक्के मतदान १८ विधानसभा मतदारसंघात झाले आहे. या कमी मतदानाला डोंबिवलीजवळील औद्योगिक पट्ट्यातील स्थलांतरीत कामगार, भिवंडीच्या लूम कारखान्यांमधील कामगार आणि नवी मुंंबईमधील माथाडी कामगारांमधील स्थलांतरीत कामगार काहीअंशी कारणीभूत आहेत, असे जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. यामुळे ‘सुमोटो डिलेशन’ पद्धतीचा वापर करून या कामगारांची नावे वगळण्याचे सुतोवाचही त्यांनी केले.
जिल्ह्यात ४७.९१ टक्के म्हणजे ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदारांपैकी ३० लाख ६२ हजार ५४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये १७ लाख ३२ हजार ९१२ पुरूषांसह १३ लाख २९ हजार ४८७ महिला आणि १४५ इतर मतदारांनी मतदान केले आहे. यात सर्वाधिक शहापूर तालुक्यात ६४.८० टक्के तर सर्वात कमी डोंबिवलीत ४०.७२ टक्के मतदान झाले. लोकसभेच्या तुलनेत दीड टक्का आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत कमीतकमी अडीच टक्के मतदान घसरले आहे. मोठ्याप्रमाणात जनजागृती करूनही मतदान कमी झाले आहे. यास बहुतांशी शहरी भागास लागून असलेल्या औद्योगिक पट्यातील कामगारांसह लूम व माथाडी कामगार मतदान कालावधीत स्थलांतरीतच राहिल्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे कारण जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
स्थलांतरीत कामगारांची कल्पना आयोगाला देण्यात आली होती. मात्र, निवडणुकीच्या कमी कालावधीमध्ये ‘सुमोटो डिलेशन’ही पद्धत वापरणे योग्य नसल्याचे आयोगाने सूचित केले. त्यामुळे स्थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करणे शक्य झाले नाही. परंतु, यानंतर ‘सुमोटो डिलेशन’ पद्धतीनुसार स्थलांतरीत मतदारांची नावे कमी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सलग सुट्याही कारणीभूत : लोकसभेप्रमाणे यावेळी ही तीन दिवस सुट्या आल्यामुळे मतदार गावी गेला असावा किंवा काहींनी सुटीचा आनंद घेण्याच्या दृष्टीने मतदानाला महत्त्व दिलेले नसावे हे कारणही कमी मतदानास जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. याशिवाय या निवडणुकीच्या मतदानावरील बहिष्कारा संदर्भात जिल्ह्यातील एकाही गावपाड्यातून अर्ज किंवा निवेदन आले नाही. यामुळे योजना, निर्णय आदींची प्रशासनाकडून अंमलबजावणी होण्यास विलंब झाल्यामुळे मतदार नाराज होऊन मतदानास आले नाही, असे म्हणणे उचित नसल्याचेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
विरोधकही कमी पडल्याचा परिणाम
मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ वगळता जिल्ह्यातील इतर सर्वच मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घटल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ताधाºयांनी दिलेली आश्वासने खोटी ठरत असल्यानेच आणि जनतेलाही ही आश्वासने खोटी असल्याची पक्की खात्री झाल्यानेच मतदानाची टक्केवारी घटली आहे. विरोधकही सत्ताधाºयांच्या विरोधात आक्रमक न झाल्यानेही त्याचाही फटका टक्केवारी कमी होण्यास कारणीभूत ठरला आहे.
ठाण्यासह जिल्ह्यातील इतर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घटली आहे. सत्ताधाºयांनी दिलेल्या खोट्या आश्वासनांना आता जनता भुललेली नाही. त्यांच्या समस्या आजही जैसे थे आहेत. मेट्रो असो किंवा क्लस्टर किंवा जिल्ह्यासाठीचे धरण आदी मुद्यांचा शिवसेना, भाजपने प्रचार केला होता.
मतांच्या घसरलेल्या टक्केवारीवरुन हेच स्पष्ट होते की, या मुद्यांवरुन आता यापुढे निवडणुका लढल्या जाऊ शकत नाहीत. जनतेने तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. निवडणुका आल्या की, कलम ३७० सारखे विविध भावनीक मुद्दे केवळ रेटले जातात. मात्र, आता जनता त्रस्त झाली असून त्यांनी आपला राग कमी मतदान करुन व्यक्त केला आहे.
मतदानाचा टक्का वाढवण्यात विरोधकही कमी पडले. त्यांनी पाच वर्षात आक्रमक भूमिका न घेतल्यानेही मतदानात घट झाली असावी. विरोधक म्हणून जनता पर्यायाच्या शोधात असतानाच विरोधी मंडळी खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी भाजप, सेनेत सामील झाली. त्यामुळेही टक्केवारी कमी झाली असावी.- जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस