ठाणे : गेले १४ दिवस ठाणे जिल्ह्यात सुरू असलेला विधानसभा निवडणूक प्रचाराचा धुराळा आता खाली बसला असून प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. पुढील ४८ तासांत छुप्या प्रचारावर सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा भर असणार आहे. मात्र, शेवटचे दोन दिवस पावसाने उमेदवारांच्या प्रचारावर अक्षरश: पाणी फिरवले. त्यामुळे काही नेत्यांच्या सभा रद्द झाल्या, तर काही उमेदवारांना आपल्या प्रचारफेऱ्या गुंडाळाव्या लागल्या.
जिल्ह्यातील मतदारसंघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अशोक गहलोत, मनोज तिवारी, सुप्रिया सुळे, अजित पवार, विनोद तावडे, पीयूष गोयल, मनसेअध्यक्ष राज ठाकरे, ओवेसी आदी प्रमुख नेत्यांसह इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा झाल्या. यामध्ये सत्ताधारी भाजप, शिवसेनेने काश्मीरमधील ३७० कलम रद्द करणे आणि गेल्या पाच वर्षांत पूर्ण केलेल्या अथवा सुरू केलेल्या विकासकामांच्या बदल्यात मतांचा जोगवा मागितला. राष्ट्रवादी, मनसे आणि काँग्रेसने युती सरकारने मूलभूत सुविधांसह इतर महत्त्वाच्या मुद्यांकडे लक्ष न देता कलम ३७० वरच कसा भर दिला, याचा समाचार घेतला.
पंतप्रधान मोदी यांनी पक्षात नव्याने आलेल्या गणेश नाईक यांच्यासाठी नवी मुंबईत सभा घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ठाणे, उल्हासनगर येथे सभा झाल्या, तर कल्याण पूर्वेला त्यांनी धावती भेट दिली. भाजप कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही उल्हासनगरला हजेरी लावली होती. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि विनोद तावडे यांनी ‘कॉफी विथ ठाणे’ या कार्यक्रमांतर्गत ठाण्याला भेट दिली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही कल्याण पूर्वेत सभा घेतली. राजनाथ सिंह यांचा रोड शो मीरा-भाईंदरमध्ये झाला. उद्धव ठाकरे यांची प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ठाण्यात सभा झाली.
काँग्रेसच्या नेत्यांची प्रचाराकडे पाठ
जिल्ह्यात ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी, भिवंडी, कल्याण, भिवंडी, मीरा-भाईंदर आदी ठिकाणी काँग्रेसच्या वतीने उमेदवार देण्यात आले आहेत. केवळ राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीच मीरा-भाईंदरमध्ये सभा घेतली. मात्र, राज्यातील इतर नेत्यांनी ठाण्यातील मतदारसंघाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
असा रंगला प्रचार...
प्रचारफेºया, रॅली, चौकसभा यावरच उमेदवारांनी अधिक भर दिल्याचे दिसून आले. शिवसेनेकडून भाजपबरोबर युती का केली, हे ठसवण्याचा प्रयत्न केला गेला. क्लस्टरमुळे होणारे फायदे, राम मंदिर, ३७० कलम यावर सत्ताधाऱ्यांनी प्रचारात भर दिल्याचे दिसून आले. यातील होऊ घातलेल्या मेट्रो, जलवाहतूक व इतर प्रकल्पांचा प्रचारात ऊहापोह झाला.
मतदारांना बाहेर काढण्याची रणनिती
प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी आता पुढील ४८ तास छुपा प्रचार रंगणार आहे. यासाठी विविध पक्षांकडून प्रत्येक पदाधिकाºयांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मतदानाचा टक्का वाढविण्याबरोबरच तरुण मतदारांना बाहेर कसे काढायचे, यापूर्वी झोपडपट्टीमधील मतदार हा पटकन बाहेर पडत होता. आता मात्र चित्र बदलले असून इमारतींमधील मतदार बाहेर पडताना अधिक दिसत आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील मतदारांना बाहेर काढण्यासाठी रणनीती निश्चित करण्यात आली आहे.