डोंबिवली : भाजपचे उमेदवार आमदार रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी डोंबिवली मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे शहरात वाहतूककोंडी झाली होती. त्यातून सुटका व्हावी, यासाठी चव्हाण दुचाकीवर स्वार झाले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे सारथ्य करत त्यांना निवडणूक कार्यालयापर्यंत नेले. तेथे चव्हाण यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जयराम पवार यांच्याकडे अर्ज सादर केला. यावेळी महापौर विनीता राणे, डॉ. शिंदे, शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे उपस्थित होते.पश्चिमेतील सम्राट चौक येथील जनसंपर्क कार्यालयापासून चव्हाण यांच्या समर्थकांनी सकाळी रॅली काढली. यात आमदार निरंजन डावखरे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अंकुश गायकवाड, सदानंद थरवळ, उपमहापौर रमाकांत मढवी आदी सहभागी झाले होते.रॅलीच्यावेळी वाहतूक नियोजन ठरले फेलकार्यकर्त्यांच्या वाहनांमुळे बहुतांश भागांत कोंडी झाली. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन कोलमडले. घनश्याम गुप्ते रस्त्यावर रॅली आल्यानंतर दुतर्फा असलेल्या रिक्षांमुळे एका बाजूने रॅली, तर दुसऱ्या बाजूने वाहने अशी कोंडी झाली. कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी वाहनांवर काठ्या मारल्या.सम्राट चौकात एका ठिकाणी एक रुग्णवाहिका अडकली होती. चव्हाण यांनी तातडीने सगळ्यांना बाजूला होण्याचे संदेश देत पोलिसांना रुग्णवाहिकेला मार्ग करून देण्याची विनंती केली.कोंडीचा फटका दुपारच्या सत्रातील स्कूल बसनाही बसला. पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी बसना प्राधान्य दिले.गणपती मंदिर परिसर, फडके पथ, बाजीप्रभू चौकातही कोंडी झाली होती. सर्वेश हॉलकडून स्टेशनकडे येणारा रस्ता एकेरी दिशेला बंद केला होता.
Maharashtra Election 2019 : खासदार श्रीकांत शिदें यांनी केले चव्हाण यांचे सारथ्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 1:24 AM