कल्याण : कल्याण पूर्वेत महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड हे आहेत. त्याठिकाणी शिवसैनिकांनी गायकवाड यांच्या विजयासाठी काम केले पाहिजे. मात्र, काही शिवसैनिक व नगरसेवकांनी बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारात उतरण्याकरिता राजीनामे दिले आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काही फरक पडत नाही. त्यांच्याविरोधात ठाकरे हेच योग्य ती कारवाई करतील, अशा शब्दांत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरांना गुरुवारी इशारा दिला.महायुतीच्या कल्याण पश्चिमेतील उमेदवाराच्या प्रचारार्थ कल्याण स्पोटर््स कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी शिंदे बोलत होते. शिंदे म्हणाले की, बंडखोरीचा परिणाम महायुतीवर होणार नाही.महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कल्याण पश्चिम व पूर्वेतील उमेदवारांसाठी काम केले पाहिजे. जो सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षाची शिस्त व आदेश पाळतो, त्यानुसार काम करतो तोच शिवसेना व भाजपमध्ये मोठा होऊ शकतो.प्रकाश पाटील यासारखा कार्यकर्ता कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता काम करीत आहे. त्याची दखल पक्षाकडून घेतली जाते. प्रत्येक पक्षात छोट्यामोठ्या कुरबुरी असतात. याचा अर्थ पक्षाच्या आदेशाविरोधात शिस्त धाब्यावर बसवून बंडखोरी करणे, हे योग्य नाही.नरेंद्र पवारांचा पत्ता मी कापला नाही- पाटीलकल्याण पश्चिमेची भाजपची जागा मी शिवसेनेला सोडली, असा माझ्याविषयी गैरसमज पसरवला जातो. आमदार नरेंद्र पवार यांची जागा पक्षाने शिवसेनेला सोडली, तेव्हा त्यांचा मला फोन आला. मी स्वत: याप्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी युतीच्या जागावाटपात तो शिवसेना दिला असल्याचे स्पष्ट केले. मात्र, मतदारसंघ सोडण्याशी माझा काडीमात्र संबंध नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. विधानसभेसाठी कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे घेतला. लोकसभा निवडणुकीत भिवंडीचा मतदारसंघ शिवसेनेने मागितला, तर सोडाल का, असा प्रतिप्रश्न पाटील यांना केला असता ते म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भिवंडी मतदारसंघ मागत होती. मात्र, मी सोडला नाही. मला पालकमंत्र्यावर विश्वास आहे, असेही ते म्हणाले. काही लोकांकडून मतदारसंघ सोडण्याबाबत गैरसमज पसरवला जातो. त्यापासून कार्यकर्त्यांनी दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
Maharashtra Election 2019: शिवसैनिकांच्या राजीनाम्याने फरक नाही - एकनाथ शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 5:32 AM