कल्याण : भाजप उमेदवाराविरोधात केलेली बंडखोरी शमवण्यासाठी वाढत असलेल्या पक्षश्रेष्ठींच्या दबावाला कंटाळून पूर्वेकडील आणि उल्हासनगरमधील शिवसेनेच्या २६ नगरसेवकांनी आणि सुमारे २०० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फॅक्सद्वारे पाठवल्याने पूर्व मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले आहे. बंडखोरी केल्यामुळे पक्ष अडचणीत येऊ नये, म्हणून राजीनामे दिल्याचा दावा या पदाधिकाऱ्यांकडून केला जात असून, आता आम्ही अपक्ष म्हणून काम करायला मोकळे झालो आहोत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.भाजप उमेदवार गणपत गायकवाड यांच्याविरोधात शिवसेनेचे धनंजय बोडारे हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे ठाकले आहेत. पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे नगरसेवक अधिक असल्याने हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, अशी मागणी नगरसेवक आणि पदाधिकाºयांकडून करण्यात आली होती. परंतु, तो भाजपच्या वाट्याला गेल्याने शिवसेनेचे उल्हासनगरचे गटनेते धनंजय बोडारे यांनी बंडखोरी करत, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी पक्षाच्या नेत्यांकडून खूप प्रयत्न झाले. पण, अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत बोडारे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवला, तरी वरिष्ठांकडून बोडारे आणि स्थानिक नगरसेवक तसेच पक्ष पदाधिकाºयांवर दबावतंत्राचा वापर सुरूच राहिला. यासंदर्भात नगरसेवक आणि पदाधिकाºयांनी वरिष्ठांशी चर्चाही केली, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर, वाढता दबाव पाहता बुधवारी दुपारी सर्व नगरसेवक आणि पदाधिकाºयांची एका ठिकाणी विशेष बैठक पार पडली. यात सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेऊन तो तत्काळ अमलातही आणण्यात आला. त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविले असून यावर आता काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बंडखोरीपाठोपाठ शिवसैनिकांनी राजीनामास्त्र उगारल्याने पक्षसमोर पेच निर्माण झाला आहे. कल्याणमध्ये सेनेचे १८ आणि उल्हासनगरमध्ये आठ नगरसेवक आहेत. विधानसभा क्षेत्रप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, शहरसंघटक, महिला व युवासेना आदी २०० पदाधिकाºयांनी राजीनामे दिले आहेत.पक्षाच्या दबावतंत्रामुळे घेतली भूमिकाशिवसेनेचे कल्याण पूर्व विधानसभा सहसंपर्कप्रमुख शरद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, वरिष्ठांकडून दबाव येत होता. पूर्वेतील पक्षाची ताकद पाहता याठिकाणी निवडणूक लढविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. याआधी वरिष्ठांशी चर्चा केली होती. परंतु, त्यांनी आमचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून सातत्याने दबावतंत्र सुरू असल्याने सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षप्रमुखांकडे राजीनामे पाठवले असून, आमच्या या निर्णयामुळे आता पक्षापुढे कोणतीही अडचण राहणार नाही आणि आम्हीदेखील निवडणूक लढवायला मोकळे झालो, असे पाटील यांनी सांगितले.स्टंटबाजीची चर्चानगरसेवकांनी पदांचे राजीनामे पक्षप्रमुखांना पाठविले आहेत. त्यांना खरोखरीच राजीनामे द्यायचे होते, तर ते आयुक्तांकडे द्यायला हवे होते. त्यामुळे त्यांची ही कृती म्हणजे प्रसिद्धी लाटण्यासाठी केलेली स्टंटबाजी असल्याची चर्चा राजीनामानाट्यानंतर सर्वत्र सुरू होती.राजीनाम्याबाबत माहिती नाही : यासंदर्भात शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सामूहिक राजीनाम्यांबाबत आपणास काहीहीमाहिती नसल्याचे सांगितले.
Maharashtra Election 2019 : बंडापाठोपाठ आता शिवसैनिकांचे राजीनामास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 5:42 AM