कल्याण - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपा यांनी युती जाहीर केली असली तरी ठिकठिकाणी दोन्ही पक्षाला बंडखोरीचा फटका बसताना पाहायला मिळत आहे. कल्याण पूर्व मतदारसंघ युतीमध्ये भाजपाला सोडण्यात आल्यामुळे स्थानिक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत या मतदारसंघात शिवसेनेचे उल्हासनगर महापालिका विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
धनंजय बोडारे यांच्या शक्तीप्रदर्शनावेळी यावेळी कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांच्यासह शिवसेनेचे 15 पेक्षा जास्त नगरसेवक तसेच पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे भाजपा-शिवसेनेचे अधिकृत उमेदवार गणपत गायकवाड यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. बंडखोरीचा कमी फटका बसावा यासाठी शिवसेना-भाजपाने युती जाहीर करण्यास विरोध केला मात्र तरीही युतीतल्या जागावाटपामध्ये अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंड पुकारल्याचं पाहायला मिळत आहे.
2014 मध्ये शिवसेना-भाजपा युती न झाल्याने दोन्ही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढविली होती. त्यातच कल्याण पश्चिम या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार नरेंद्र पवार यांनी विजय मिळवित आमदारकी पटकावली होती. कल्याण पूर्व मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले गणपत गायकवाड यांनी 777 मतांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव 2014 मध्ये केला होता. गेली 2 टर्म या मतदारसंघाचे नेतृत्व गणपत गायकवाड करत आहेत. मात्र या निवडणुकीत गणपत गायकवाड यांना भाजपाचा अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे शिवसैनिक नाराज झाले असून त्यांना धनंजय बोडारे यांच्या रुपानं कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
किंबहुना उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच इच्छुक उमेदवारांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म वाटपावरुनही गोंधळ झाल्याचं चित्र होतं. कल्याण ग्रामीण मतदारसंघातही तीच अवस्था पाहायला मिळाली. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना पक्षाने एबी फॉर्म दिला, भोईरांनी उमेदवारी अर्ज भरलाही त्यानंतर या मतदारसंघातून रमेश म्हात्रे यांना अधिकृत उमेदवारी घोषित केल्याने कल्याण ग्रामीणच्या उमेदवारीवरुन शिवसैनिकही संभ्रमात असल्याचं चित्र आहे.