ठाणे : एरव्ही, दैनंदिन जीवनातील प्रत्येक घडामोड सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तरुणाईने सोमवारी मतदान केल्यानंतरचे फोटोही झटपट पोस्ट केले. पण, सेल्फी विथ व्होटबाबतीत तरुणाईइतकाच उत्साह पाहायला मिळाला, तो मध्यमवयीन व ज्येष्ठ नागरिकांमध्येही. अनेकांनी सकाळपासूनच फेसबुक, व्हॉट्सअॅपवर आपले सेल्फी विथ व्होटचे फोटो शेअर करत आम्ही मतदान केले, तुमचे काय? मतदान करा... लोकशाहीचा उत्सव साजरा करा, अशा आवाहनातून एकमेकांना जबाबदारीची जाणीव करून दिली आणि अवघा सोशल मीडिया ‘व्होट’मय होऊन गेला.
सोमवारी झालेल्या मतदानाचा टक्का काहीसा घटला असला, तरी तरुणाईचा चांगला उत्साह होता. हा उत्साह सोशल मीडियावरही पाहायला मिळाला. सोशल मीडियावर लोकशाहीच्या उत्सवाचाच फिव्हर आणि त्याअनुषंगाने चर्चा रंगली होती.
मतदान केल्यावर अनेकांनी मतदानाची खूण अर्थात शाई लावलेल्या बोटासोबतचे सेल्फी तसेच सहकुटुंबाचे फोटो व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करून आपण विधानसभेच्या मतदानाचा हक्क बजावल्याचे अभिमानाने दाखवले.
सोशल मीडियावर मध्यमवयीन आणि ज्येष्ठही मागे नव्हते. ठाण्यातील कलाकार, दिग्दर्शक रवी जाधव, विजू माने, अशोक नारकर, अभिजित चव्हाण यांनीही आपले सेल्फी विथ व्होटचे फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर केले.
लोकशाहीचा उत्सव साजरा करू, आम्ही केलं तुम्हीही मतदान करा..., एक डाग जो मिरवण्यासारखा..., अधिकार मतदानाचा... अशा कॅप्शनसह त्यांनी नेटकऱ्यांना आवाहन केले. नवमतदारांनीही फर्स्ट व्होट... म्हणत आपले फोटो पोस्ट केले.