ठाणे - ठाणे शहर विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असतानाच, सिव्हील रुग्णालयाजवळील एका केंद्रावरील ईव्हीएम मशीनवर शाई फेकण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया जवळपास 25 मिनिटे थांबावावी लागली होती. ठाण्यातील बहुजन नेते असलेले सुनील खांबे यांनी हा प्रकार केला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सुनील खांबे हे ठाणे विधानसभा मतदार संघातील सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेले होते. मतदान झाल्यानंतर ते थेट मतदान केंद्राच्या बाहेर न पडता त्यांच्याजवळ असलेली शाईची बाटली बाहेर काढली. ती थेट त्यांनी ईव्हीएम मशीनवर फेकली. त्यामुळे मतदान केंद्रामध्ये आणि मशीनवर देखील ही शाई पडली. शाई फेकून त्यांनी मतदान केंद्रामध्येच इव्हीएम मशीनच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना मतदार केंद्राच्या बाहेर काढले. मात्र हा गोंधळ 15 ते 20 मिनिटे सुरू असल्याने 25 मिनिटे या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया थांबली होती. त्यानंतर पुन्हा मतदान सुरू करण्यात आले. ईव्हीएम मशीन लोकशाहीसाठी घातक असून ही मशीन बंद करण्यात यावी अशी मागणी खांबे यांनी केली यावेळी केली आहे. खांबे यांना ठाणे नगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून मतदान केंद्रावरील अधिकारी यांच्या सुचनेनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या 13व्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सोमवारी, 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या मत प्रक्रियेमध्ये सुमारे 9 कोटी मतदार 3237 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत. राज्यात एकूण 8,98,39,600 मतदार असून यामध्ये 4,68,75,750 पुरुष, 4,28,43,635 महिला, 3,96,000 दिव्यांग, 1,17,581 सर्व्हिस मतदार आणि 2,634- तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडावी, यासाठी आयोगाने केंद्रीय, तसेच राज्य राखीव दलाची मदत घेतली असून, राज्य पोलीस दलातील सुमारे 40 हजार कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तावर असतील. मतदान केंद्राचा परिसर आणि स्ट्राँगरूमच्या बाहेर चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अचानक उद्भवलेला प्रसंग निस्तारण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्स तयार ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्राच्या परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे, तसेच केंद्राच्या आतमध्ये मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे.