उल्हासनगर : कलानी कुटुंबामुळे भाजपला उल्हासनगरात पहिला महापौर मिळाला. मात्र, दिलेला शब्द न पाळणाऱ्या भाजपला धडा शिकवण्याचा इशारा ओमी कलानी यांनी दिला. भाजपने कलानी कुटुंबाला उमेदवारी नाकारल्यावर ओमी कलानी यांनी शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. कुमार आयलानी यांनीही शक्तिप्रदर्शन करत भाजपच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी, आमदार ज्योती कलानी यांनीही राष्ट्रवादीतर्फे अर्ज दाखल केला असून, गटनेते भरत गंगोत्री यांनीही राष्ट्रवादीतर्फेच उमेदवारी दाखल केल्याने कोण बाद होते आणि कोण रिंगणात राहते, हे अर्ज छाननीनंतरच स्पष्ट होणार आहे.उल्हासनगरात कुमार आयलानी विरुद्ध ओमी कलानी असा थेट सामना रंगणार आहे. रिपाइंचे भगवान भालेराव यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. ज्योती कलानी व ओमी कलानी यांचा एकच एबी फॉर्म असून दोघांपैकी एकाने उमेदवारी मागे घेतली तरी, एबी फॉर्म दुसºयाला लागू होत असल्याची माहिती मुकादम यांनी दिली. राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री यांनी पक्षाच्या एबी फॉर्मवर उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी, पक्षाच्या आदेशान्वये उमेदवारी मागे घेण्याचे संकेत दिले आहे. दरम्यान, ओमी कलानी राष्ट्रवादीकडून रिंगणात राहणार असल्याचे बोलले जात आहे.उल्हासनगर मतदारसंघावर दावा सांगणारे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी हे पक्ष पदाधिकाऱ्यांसह कुमार आयलानी यांच्यासोबत भाजपच्या रॅलीत होते. ओमी कलानी यांच्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष राधाचरण करोतिया, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले उपस्थित होते. रिपाइंचे भालेराव यांनी अर्ज मागे घेतला नाही तर, आयलानी, कलानी व भालेराव यांच्यात खरी लढत रंगण्याची शक्यता आहे.
Maharashtra Election 2019 : भाजपला धडा शिकविणार - ओमी कलानी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 1:14 AM