मीरारोड - मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघाचा महायुती आणि नंतर भाजपात जागा वाटप , उमेदवारी वरून चाललेला अटीतटीचा तिढा अखेर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुटला आहे . भाजपाकडून मंगळवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या यादीत माजी आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे . त्यामुळे मेहता समर्थकांनी जल्लोष केला आहे .
मीरा भाईंदरच्या माजी महापौर राहिलेल्या गीता जैन यांनी २०१९ मध्ये तत्कालीन भाजपाचे उमेदवार आ . मेहतांचा पराभव केला होता व आमदार म्हणून निवडून आल्या होत्या . त्यावेळी देखील जैन यांनी भाजपा कडून उमेदवारी मागितली होती . परंतु मेहता हे भाजपा नेते देंवेंद्र फडणवीस आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचे मर्जीतले मानले जात असल्याने त्यावेळी देखील मेहतांच्या विरोधात शहरातील वातावरण असताना मेहतांना उमेदवारी दिली गेली होती .
आमदार झाल्यावर जैन ह्या फडणवीस यांची भेट घेऊन भाजपा सोबत गेल्या . मात्र सरकार बदलल्याने शिवसेनेला पाठिंबा दिला . ठाकरे सरकार पडणार असते वेळी जैन ह्यांना परत भाजपाने जवळ केले . तर भाजपा नेत्याच्या सुचणे नुसार त्या एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी होत गुवाहाटीला गेल्या . शिंदे - फडणवीस ह्या दोघांनी जैन यांना उमेदवारी देण्याचे आश्वस्त केले होते . दुसरीकडे शिंदे सेनेने मीरा भाईंदर वर दावा केला .
मीरा भाईंदर मतदार संघ भाजपाच्या वाट्याला शेवटच्या क्षणी गेला तशीच भाजपाची उमेदवारी देखील शेवटच्या क्षणी २९ ऑक्टोबर रोजी नरेंद्र मेहता यांना दिली गेली . ह्या वरून सदर मतदार संघात महायुतीत रस्सीखेच होती तेवढीच भाजपात उमेदवारी मिळवण्या वरून होती असे स्पष्ट होते . मेहता यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे . उमेदवारी मिळण्या आधी मेहतांनी आपले विविध प्रकारे शक्ती प्रदर्शन चालवले होते . तर मेहतांनी स्वतः सह त्यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज भाजपा आणि अपक्ष म्हणून सोमवारीच भरला होता . पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची देखील त्यांची तयारी असल्याची चर्चा होती .