मीरारोड - मीरारोड मधील एका गृहसंकुलात माजी भाजपा आमदार नरेंद्र मेहता याना मतं द्या असं आवाहन माजी नगरसेवकांनी केले. त्यानंतर उपस्थित महिलांना भेट वस्तू देण्यात आल्याचा प्रकार व्हिडिओ व फोटो समोर आल्याने विरोधकांकडून कारवाईची मागणी होत आहे . विधानसभा निवडणुकीत सध्या कोणत्यातरी कार्यक्रमाच्या आड भेटवस्तू देणे वा भेट वस्तूसाठी टोकन देऊन ती भेट परिसरातील कार्यकर्त्या मार्फत पोहचवणे आदी प्रकार सुरू आहेत.
त्यातच मंगळवार २२ ऑक्टोबर रोजी मीरारोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्स मध्ये नवग्रह संकुलाच्या आवारात महिलांचा कार्यक्रम होता . यावेळी मेहता यांचे समर्थक भाजपाचे माजी नगरसेवक अनिल विराणी , मनोज दुबे , सीमा शाह , रेखा विराणी आदींसह भाजपा कार्यकर्त्या या कार्यक्रमास आले होते . यावेळी कार्यक्रमात माजी नगरसेवकांनी नरेंद्र मेहता यांना मतदान करण्याचे आवाहन केले . त्या नंतर जमलेल्या महिलांना विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तूंची भेट देण्यात आली . सदर कार्यक्रमाचे व्हिडीओ आणि छायाचित्रे व्हायरल झाले आहेत . या प्रकरणी माजी भाजपा नगरसेवक अनिल विराणी यांनी सांगितले कि , सदर संकुलाचा हळदी कुंकू कार्यक्रम होता व त्यासाठी आम्हा स्थानिक माजी नगरसेवकांना रहिवाशांनी बोलावले होते . भेटवस्तू आम्ही दिल्या नसून त्या रहिवाशांनी आणलेल्या होत्या व त्यांनी वाटल्या असं स्पष्टीकरण दिले.
सत्यकाम प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड . कृष्णा गुप्ता म्हणाले की , निवडणूक काळात शहरात उघडपणे राजकारणी हे मतदारांना भेटवस्तू वाटत आहेत . भ्रष्ट आणि कर्तव्यच्युकार अधिकारी - कर्मचारी यांच्या आशीर्वादाने आचार संहिता भंग करणे राजकारण्यांच्या हातचा मळ बनला आहे . ह्यातून भ्रष्टाचाराचा व काळा पैसा मुबलक वापरला जात असल्याने गुन्हे दाखल करून बेजबाबदार अधिकारी - कर्मचारी यांना पण निलंबित करावे अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, मोठ्या मोठ्या गृहसंकुलातील आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेले मतदार देखील निवडणुकीत राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून भेट वस्तू घेणे , इमारतीचे कामे करून घेणे , सहल वा जेवणावळी झोडणे आदी प्रकार करणे लोकशाहीला मारक असून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारे आहे . अशा प्रकारांना आळा घालून सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे अशी मागणी माजी नगरसेवक रोहित सुवर्णांनी केली.