उल्हासनगर : वंचितचे घोषित उमेदवार संजय गुप्ता यांच्यावर नवीमुंबई एपीएमसी पोलीस ठाण्यात शनिवारी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. गुप्ता यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल करून आपल्याला फसविले असल्याचे म्हटले आहे. तसेच सोमवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
उल्हासनगर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने संजय गुप्ता यांची उमेदवारी गेल्या आठवड्यात घोषित केली. दरम्यान २६ ऑक्टोबर रोजी शनिवारी नवीमुंबई एपीएमसी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. पीडित महिला उल्हासनगर पूर्वेत राहणारी असून तिला बिझनेस सेट करून देतो. असे आमिष दाखवून ऑगस्ट मध्ये अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. गुप्ता हे शहरातील भाजप उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष होते. आमदार कुमार आयलानी यांच्या सोबत वाद उफाळून आल्यावर त्यांनी भाजपाला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला.
वंचित कडून संजय गुप्ता यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला असून माझ्या विरोधात काही जण छडयंत्र रचत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर वंचितचे शहराध्यक्ष उज्वल महाले यांनी संजय गुप्ता यांच्यावर झालेला गुन्हा बनावट स्वरूपाचा असून पोलीस चौकशी करीत असल्याची प्रतिक्रिया दिली. तर पक्ष प्रमुख्य याबाबत काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.