महाराष्ट्र निवडणूक २०१९: कोपरी-पाचपाखाडीत मतदानात घसरलेली टक्केवारी कुणाच्या पथ्यावर?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 07:17 PM2019-10-22T19:17:28+5:302019-10-22T19:25:40+5:30
कोपरी-पाचपाखाडी विधानसभा निवडणूक २०१९ - या मतदारसंघात शिवसेना, काँग्रेस आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहण्यास मिळाली.
ठाणे : कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात मतदानाचा टक्का यावेळी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ४ टक्क्यांनी घसरला आहे. या मतदारसंघात क्लस्टरचा मुद्दा निवडणुकीदरम्यान चर्चेला होता. या मतदारसंघाच्या मतदानात पुरूष अथवा महिला मतदारांना एक लाखाचा आकडा पार करता आला नाही. या घसरलेल्या मतदानाची टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडते, हे येत्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांसाठी २१ ऑक्टोबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे, काँग्रेसचे उमेदवार संजय घाडीगावकर, मनसेचे उमेदवार महेश कदम, तसेच वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार उन्मेश बागवे आणि अपक्षांसह अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. या मतदारसंघात शिवसेना, काँग्रेस आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहण्यास मिळाली. ठाण्याचे पालकमंत्री निवडणूक रिंगणात आल्याने, तसेच याच मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाल्याने या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने क्लस्टरच्या विरोधात प्रचार केला होता. शिवसेनेने मात्र क्लस्टरच्याच मुद्यावरच निवडणूक लढवली होती. तरीसुद्धा मतदारांनी का पाठ फिरवली, याबाबत आता चर्चा सुरू आहे.
मात्र, या मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीवेळी तीन लाख ४७ हजार ३८० इतके मतदार होते. त्यामध्ये एक लाख ९२ हजार ३३५ पुरु ष तर, एक लाख ५५ हजार ४५ महिला मतदारांचा समावेश होता. त्यावेळी एक लाख ८४ हजार ४६७ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून ५३.१० टक्के मतदानाची नोंद केली होती. यावर्षी जिल्हा निवडणूक विभागाने राबवलेल्या नवीन मतदार नोंदणी अभियानातंर्गत तीन हजार ९९५ इतक्या नवीन मतदारंची नोंद झाली. यामध्ये एक लाख ९३ हजार ८५२ पुरुष, एक लाख ५८ हजार ९९६ महिला, १३४ सैनिक तर दहा इतर अशा तीन लाख ५२ हजार ८५८ मतदारांपैकी एक लाख ७३ हजार २३० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. एकूण ४९.०९ टक्के इतकेच मतदान झाल्याने ही धोक्याची घंटा नेमकी कोणासाठी आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.