ठाणे : ठाण्यातील मुंब्रा - कळवा या मतदार संघात ११ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचे हॅट्रिकसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून त्यांची लढत शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांच्याशी होत आहे. या मतदारसंघात यंदा मतदानाची टक्केवारी ही २.४८ टक्यांनी वाढली आहे. यंदा येथे ४९.९६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे मतदानाच्या या वाढलेल्या टक्केवारीचा कोणाला फायदा होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
वास्तविक पाहता या मतदारसंघात झालेल्या विकास कामांच्या जोरावर या मतांची टक्केवारी आणखी वाढेल, अशी वाटत होती. मात्र, ती आशा फोल ठरली का?, शिवसेनेच्या मतदारांनी दीपाली सय्यद यांना नाकारले का? अशीदेखील चर्चा असून त्यामुळेच मतांची टक्केवारी दोन टक्यांनी वाढली असली तरी त्याचे परिणाम फार काही जास्त प्रमाणात होतील असे दिसत नाही.
२०१४ मध्ये या मतदारसंघात ४७.४८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. समाजवादी, एमआयएम या निवडणुकीत बाहेर आहे. परंतु, एमआयएमने ‘आप’ ला टाळी दिली असल्याने त्याचा किती परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील निवडणुकीत ३ लाख ४८ हजार ४११ मतदात्यांपैकी १ लाख ६५ हजार ४२७ मतदात्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पैकी ९२ हजार ४५५ पुरुष आणि ७२ हजार ९७२ स्त्री मतदारांनी येथे मतदान केले होते. यंदा या मतदारसंघात ३ लाख ५७ हजार ४९३ मतदार होते. त्यापैकी १ लाख १५९ पुरुष आणि ७८ हजार ४३१ स्त्री मतदार असे मिळून एकूण १ लाख ७८ हजार ५९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यंदाच्या निवडणुकीत ४९.९६ टक्के मतदानाची नोंद झाली असून जी मागील वेळेच्या तुलनेत २.४८ टक्यांनी जास्त दिसून आली आहे. त्यामुळे वाढलेल्या टक्केवारीचा कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.मागील १० वर्षांपासून या मतदारसंघावर जितेंद्र आव्हाड यांचे वर्चस्व दिसून आले आहे. शिवसेनेने मागील दोन्ही निवडणुकांमध्ये आव्हाडांना पराभूत करण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. यंदाच्या निवडणुकीत ही रणनिती आणखी प्रबळ करण्यात आली होती. परंतु, स्थानिकांना डावलून शिवसेनेने सेलिब्रिटी चेहरा या मतदारसंघात दिला. दीपाली भोसले- सय्यद यांना उमेदवारी दिली. त्यामुळे येथील इच्छुक असलेल्या शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली. त्याचाच परिणाम म्हणून शिवसेनेचे मतदार जास्त प्रमाणात बाहेर पडले नसल्याचे दिसून आले. दुसरीकडे मागील १० वर्षांत विकास कामे करून आणि मुंब्रा - कळव्याचे एक वेगळे रोड मॉडेल तयार करूनही आव्हाडांना मतांची टक्केवारी फारशी वाढविता आली नाही, हेदेखील तितकेच सत्य म्हणावे लागणार आहे. परंतु,असे असले तरी ठाण्यातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत या मतदारसंघात २ टक्के का होईना मतदान वाढले असल्याने ती निर्णायक ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.