डोंबिवली - पुरामुळे आणि सतत सुरू असलेल्या पावसामुळे सांगली, सातारा, कोल्हापूरसह पंढरपूर शहराच्या आजूबाजूच्या गावांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील नागरिकांना वस्तू रुपात सहाय्य पोहचविण्याची व्यवस्था अभाविप डोंबिवलीकडून करण्यात आली होती. यासाठी डोंबिवलीतील नागरिकांनी मदत केली आहे.
औषधे, धान्य (गहू, तांदूळ, डाळ इ.), सुके खाद्यपदार्थ (ready to eat), बिस्किटे, चिवडा, फरसाण, कपडे, सेनेटरी नॅपकिन, ब्लॅंकेट, टॉवेल यासारख्या वस्तूचे मोठ्या प्रमाणात संकलन अभाविप कार्यालयात झाले आहे. हे सर्व सामान 10 किलोचे एक किट याप्रमाणे 350 किट तयार झाले आहेत. ज्यात डाळ, तांदूळ, चहा पावडर, हळद, साखर, तेल, साबण यांचा समावेश आहे.
वस्तूंचे सर्व पॅकिंग आणि सॉर्टईंग करण्यासाठी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे अभाविपने आवाहन केले होते. डोंबिवलीमधील प्रगती कॉलेज, मॉडेल कॉलेज, वंदेमातरम कॉलेज आणि मंजुनाथ कॉलेज यातील NSS युनिटचे 60 हुन अधिक विद्यार्थी या मदत कार्यात सहभागी झाले आहेत. मॉडेल कॉलेजचे प्रा. भोळे सर, प्रा. पटवारी सर, प्रा. सोणम मॅडम, वंदेमातरम कॉलेजचे प्रा. कोल्हे सर, मंजुनाथ कॉलेजचे प्रा. अडीगळ सर, प्रा. पुष्कर सर, प्रगती कॉलेजचे प्रा. पाटील सर, प्रा. इंगळे सर यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
महाविद्यालयात सुट्टी असूनही डोंबिवलीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला आहे. आमचा सुट्टीचा दिवस चांगल्या कामासाठी सार्थकी लागला, समाजासाठी काही करू शकलो अशी सुखद भावना सर्व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. अभाविप आणि विविध महाविद्यालयातील NSS युनिट मिळून नाविन्यपूर्ण उपक्रम समाजात घेऊन जाऊन सोबत काम करू असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. या सर्वांसाठी सुयोग मंगल कार्यालयाचे व्यवस्थापन, रा. स्व. संघ जन कल्याण समिती, रा. स्व. समिती, डोंबिवली मधील विविध सामाजिक संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या माध्यमातून कोल्हापूर आणि सांगली येथे वस्तू पोहचवल्या जाणार आहेत.
महापूर, तसेच अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात 40 जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 19 जण सांगली जिल्ह्यातील आहेत. सांगली, कोल्हापूर भागातील तब्बल 200 रस्ते आणि पूल बंद असल्याने मदत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील पूरस्थितीची हवाई पाहाणी केली. पुरामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला रशिया दौरा रद्द केला आहे.
राज्यातील दहा जिल्ह्यांत पूरपरिस्थिती असून, 70 तालुके व 761 गावे बाधित झाली आहेत. 4,47,695 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मदतकार्यात एनडीआरफच्या 32, एसडीआरफच्या 3, लष्कराच्या 21, नौदलाच्या 41, तटरक्षक दलाची 16 पथके कार्यरत आहेत. 226 बोटींद्वारे बचावकार्य सुरू आहे. पुरामुळे 40 व्यक्तींचा मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाले आहेत, तर 48 जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.