ठाणे - यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेखने गतवर्षीचा वचपा काढत महाराष्ट्र केसरीचा खिताब मिळवलाच. गतवर्षी सिंकदर शेखला पंचाच्या निर्णयाचा फटका बसल्याचा आरोप कुस्तीशौकिनांनी आणि कुस्तीतील काही जाणकारांनी केला होता. त्यामुळे, यंदाच्या कुस्ती मैदानाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यंदाही सिकंदरने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत गतविजेत्या शिवराज राक्षेला अवघ्या २२ सेकंदामध्ये आस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी खिताब पटकावला. त्यामुळे, सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सिंकदरला बोलावून त्याचं कौतुक केलं. तसेच, त्याच्यासाठी सरकारकडे मागणीही केली आहे.
सिंकदर, मानाची गदा मिळवताच काल, शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापुरातील गंगावेश तालमीत गेला होता. यावेळी पैलवान सहकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी अन् गुलालाची उधळण करत त्याचे जल्लोषी स्वागत केले. येथील आपल्या वस्तादांच्या घरी जाऊन त्याने त्यांचे दर्शन घेतले. यावेळी, कोल्हापुरात सिंकदर शेखचे जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर, आज सिकंदरने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली आहे. यावेळी, आमदार आव्हाड यांनी त्याचं उत्साहाने स्वागत करत सरकारकडे त्याच्यासाठी सरकारी नोकरीची मागणीही केली आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत, मानाची "महाराष्ट्र केसरी" स्पर्धा जिंकणारे मल्ल सिकंदर शेख यांनी आज माझ्या घरी भेट दिली. गेल्या वर्षीच सिकंदर महाराष्ट्र केसरी झाले असते. परंतु वादग्रस्त निर्णयाचा ते बळी ठरलें. पण यावेळी त्यांनी प्रतिस्पर्ध्याला कोणतीच संधी न देता अवघ्या 23 सेकंदात अस्मान दाखवले. येणाऱ्या काळात ते भारताच प्रतिनिधीत्व ऑलिंपिकमध्ये करतील याची खात्री आहे. त्यासाठी सर्वोपतरी सहकार्य करण्याचा शब्द मी त्यांना दिला आहे, असे आव्हाड यांनी म्हटले. तसेच, महाराष्ट्र सरकारला, सिकंदर शेख यांना शासकीय सेवेत समविष्ट करून घ्यावे, अशी मागणी देखील आव्हाड यांनी केली आहे.