यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा ठरणार आहे. कल्याणमधून मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे रिंगणात असून, त्यांना पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने कंबर कसली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अंबरनाथमध्येकाँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. अंबरनाथमधीलकाँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह ७ माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या भागात आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
अंबरनाथमधील काँग्रेसचं मागच्या अनेक वर्षांपासून नेतृत्व करत असलेल्या प्रदीप पाटील यांनी अंबरनाथ नगरपालिकेमध्ये नगरसेवक, विरोधी पक्षनेत्यासह विविध पदे भूषवली आहेत. तसेच अंबरनाथ पश्चिमेतील मोठ्या भागावर त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव आहे. प्रदीप पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी कल्याणचे आमदार श्रीकांत शिंदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रदीप पाटील यांच्यासोबत मिलिंद पाटील, चरण रसाळ, अर्चना रसाळ, सुरेंद्र यादव, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा स्मिता बंगेरा, युवा काँग्रेसचे हर्षल भोईर, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष नईम शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेस केला.