ठाणे : ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असल्याची एकमुखी ग्वाही महायुतीच्या नेत्यांनी बुधवारी सायंकाळी दिली. तोच धागा पकडून उमेदवार कोण असेल, यापेक्षा मोदींना ४०० पार जागा निवडून द्यायच्या असल्याचे मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले. महायुतीच्या मेळाव्याला शिवसेना आणि भाजपमधील इच्छुक असलेले नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, संजीव नाईक, मीनाक्षी शिंदे हे एकाच व्यासपीठावर हजर होते.
ठाण्यात आयोजित महायुतीच्या मेळाव्याला देसाई हजर होते. मेळाव्यानंतर देसाई म्हणाले की, महायुतीचा पहिलाच मेळावा ठाण्यात होत असल्यामुळे खूप महत्त्वाचा आहे. ठाणे लोकसभेची उमेदवारी कोणाला दिली गेली, याबाबत मला काही माहिती नाही. मात्र, सन्मानजनक उमेदवार दिला जाईल. जागा बदलाच्या चर्चेबाबत छेडले असता आपल्याला काही माहिती नसल्याचे ते म्हणाले.
महायुतीला या निवडणुकीत ४५पेक्षा जास्त जागा मिळतील, असे देसाई म्हणाले. आघाडी कोणाची आहे, समोर कोण उमेदवार आहे, यापेक्षा मोदी यांना विजयी करण्यासाठी काम करायचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी केलेली कामे जनतेसमोर न्यायची आहेत, असेही ते म्हणाले. शिंदे राज्याचे नेतृत्व करत असले तरी त्यांचे ठाण्याकडे बारीक लक्ष आहे. मागील अडीच वर्षांत राज्यात सर्वांत जास्त परदेशी गुंतवणूक आणली. आम्ही सर्वांनी शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी उठाव केला. त्याला आम्ही पाठिंबा दिला. या मेळाव्याला आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माधवी नाईक, अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे, नजीब मुल्ला, प्रभाकर सावंत आदींसह रिपाइं आठवले गटाचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते. उमेदवाराचे नाव घोषित करावे, अशी विनंती आनंद परांजपे यांनी शिवसेना आणि भाजपला केली. उमेदवाराचे नाव जाहीर केल्यावर कोणीही इकडे तिकडे जाणार नाही. तुम्ही जो उमेदवार द्याल तो निवडून आणू, असे ते म्हणाले.