मीरारोड - सत्ता आणि मत्ते साठी धर्म - जातीच्या आगी भडकवून भाजपा स्वतःची पोलीस भाजत आहे . गेल्या १० वर्षात काय केले ? ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सांगत नाही . खोटे बोलणे हीच मोदींची गॅरंटी असल्याची टीका शिवसेना नेते प्रा . नितीन बानुगडे पाटील यांनी भाईंदर येथील सभेत केले.
उद्धव सेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी गुरुवारी रात्री भाईंदरच्या नवघर शाळा मैदानात जाहीरसभा झाली . यावेळी बानुगडे पाटील म्हणाले कि , चीन ने भारताचा भाग बळकावला . राज्यात १० महिन्यात २ हजार ३६६ शेतकरी आत्महत्या झाल्या . मणिपूर मध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढली . ४५० चा गॅस सिलेंडर ११००वर तर पेट्रोल ११० वर गेले . महागाई मुळे जनतेला जगणे मुश्किल झाले पण ह्यावर मोदी आणि भाजप बोलत नाही . भ्रष्टाचारी , बलात्कारी यांच्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे आहेत.
काळा पैसे देशात आणणार , प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख टाकणार , २ कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार , महागाई रोखणार, प्रत्येकाला घर देणार , शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणार, शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात तर बाबासाहेबांचे इंदू मिल मध्ये स्मारक उभारणार अश्या आता पर्यंतच्या दिलेल्या अनेक गॅरंटीचे काय झाले ? असा सवाल करत खोटे बोलणे हीच मोदींची गॅरंटी असल्याची टीका बानुगडे पाटील यांनी केली.
खासदार विनायक राऊत म्हणाले कि , उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे नकली पुत्र म्हणून मोदींनी निर्भत्सना केली , शिवसेना तोडली याला महाराष्टाची जनता माफ करणार नाही . काश्मिरी पंडित आजही बेघर आहेत पण स्वतःच्या मित्र उद्योगपतीला १ हजार एकर जमिन घेता यावी म्हणून कलम ३७० हटवले . जाती धर्मात भांडणे लावून एकमेकांची डोकी फोडायला लावण्याचे काम भाजपा करतेय असा आरोप राऊत यांनी केला.
शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितले कि , डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संपवण्यासाठी भाजपाला ४०० पार जागा हव्या आहेत . महिला व शेतकऱ्यांवर अत्याचार , जनतेला महागाईचा मार तर बेरोजगार ना आणखी बेरोजगार मोदी आणि भाजपने केले आहे.
काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी भाजपा आणि मोदींवर टीका केली कि , ज्यांनी इंग्रजांना साथ दिली तेच आज राज्यातील गद्दारांचे सरदार आहेत . महागाई , भ्रष्टाचार , बेरोजगारी वाढवून देशातील जनतेला मूर्ख बनवले आहे . मोदी सांगतात कि आम्ही जगातील ५ वी अर्थसत्ता सांगतात आणि दुसरीकडे ८० कोटी जनतेला दारिद्र्य रेषेखाली म्हणून मोफत धान्य देतो सांगतात . यावेळी उद्धवसेना , राष्ट्रवादी पवार गट , काँग्रेस , आम आदमी पार्टी आदी पक्षांचे पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित होते .