- सदानंद नाईक उल्हासनगर - कल्याण लोकसभेसाठी शिंदे व ठाकरे यांचा समझोता होऊन त्यांची नुरा कुस्ती सुरू असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी झालेल्या दसरा मैदान येथील सभेत केला. तसेच राजन विचारे यांचे पाठींब्यासाठीचे कोणतेही पत्र आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा तब्बल ३ तास उशिरा सुरू झाली. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण व भिवंडी या ३ लोकसभे पैकी कल्याण लोकसभेत वंचित आघाडीने डॉ मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांना रिंगणात उतरविले असून त्यांच्या प्रचार सभेसाठी उल्हासनगरात आले होते. ठाकरेसेनेचे ठाणे उमेदवार राजन विचारे यांनी पाठिंब्यासाठी पत्र देण्याच्या वृत्ताला प्रकाश आंबेडकर नकार दिला. तसेच सभेत त्यांनी मोदींसह ठाकरेसेनेवर टीका केली. ताज्या सर्वेक्षणात मोदी ४०० पार नव्हेतर २८० वर आकडा आल्याचे आंबेडकर म्हणाले. तर कल्याण लोकसभेत शिंदे व ठाकरे यांच्यात अंतर्गत समझोता होऊन नुरा कुस्ती सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकीनंतर मोदी व ठाकरे सेना एकत्र येण्याची भाकीतही त्यांनी व्यक्त केले. सन-२०१४ व २०१९ च्या निवडणुकीत दिलेले आश्वासन मोदी यांनी पाळले नसल्याने, नागरिकांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळेच राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरल्याचे आंबेडकर म्हणाले.
देशाची वाटचाल देशोधडीकडे मोदींच्या आर्थिकनितीमुळे देश पाकिस्तानच्या दिशेने जात असून देशावरील कर्ज पाहता यापुढे देश चालविणे मुश्किल होणार आहे. यातूनच भारताचे ९ रत्न धोक्यात येऊन रेल्वेचे ७० टक्के खाजगीकरण होऊन ३० टक्के शासनाच्या मालकीची आहे. एकूणच मोदींची अवस्था गल्लीतील दादा व दारुड्या सारखा झाल्याची जहरी टिका आंबेडकर यांनी केली आहे.
बंदी घातलेली लसी देऊन मृत्यूचे वाटप कोविड काळात जागतिक आरोग्य संघटनेने बंदी घातलेल्या लशी नागरिकांना देऊन, नागरिकांना अप्रत्यक्ष मृत्यू दिल्याची टीका केली. *भाजप व मोदींचे हिंदुत्व खोटे. भाजप व मोदींचे हिंदूत्व खोटे असून गेल्या १० वर्षात विविध कारवाईच्या भीतीने १७ लाख नागरिकांनी देशाचे नागरिकत्व सोडले. त्यातील बहुसंख्य हिंदू असून मोदीनी मौन धारण केल्याचे आंबेडकर म्हणाले.