प्रशांत माने
डोंबिवली : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून संघटनाबांधणीचे काम जोमाने सुरू असताना येथील एमआयडीसी निवासी भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये (मनसे) पदवाटपावरून बेबनाव निर्माण झाला आहे. यात आजीमाजी पदाधिकारी नाराज झाले असून ते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या पवित्र्यात आहेत. आम्हाला पदांचा हव्यास नाही, परंतु स्थानिक नेतृत्वाने गद्दारांना पदे बहाल केल्याचा त्यांचा आरोप आहे.
मनसे डोंबिवली शहर शाखेच्या पुढाकाराने महिनाभरापूर्वी ग्रामीण भागात विभागाध्यक्ष, उपविभागीय अध्यक्ष आणि शाखाध्यक्षपदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. मात्र, यावेळी आम्हाला विश्वासात घेतले नाही. २०१५ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाशी गद्दारी केलेल्यांना पदे बहाल केल्याचा आरोप मनसे नाविकसेना सहचिटणीस नंदकिशोर (नंदू) ठोसर आणि माजी उपविभागाध्यक्ष संजय चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्यासह अन्य २० ते २५ कार्यकर्तेही या नियुक्त्यांमुळे दुखावले आहेत. ते सगळे पक्ष सोडण्याच्या पवित्र्यात आहेत. विद्यमान महिला उपशहराध्यक्षा शीतल ठोसर यांचाही नाराजांमध्ये सहभाग असल्याचे ठोसर यांनी सांगितले.गोपाळकालानंतर होणाऱ्या बैठकीत पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पक्षाची वाताहत झाली असतानाही कार्यकर्ते कामे करत आहेत. विविध आंदोलनांमधून पक्षाची भूमिका समाजापुढे ते मांडत गेले, पण आज पक्षाशी गद्दारी करणाºयांना पदे वाटली जात आहेत, हे दुर्दैव आहे. पक्षातील घाणेरड्या राजकारणाला आम्ही कंटाळलो असल्याचे ठोसर म्हणाले. ठोसर यांनी ही नाराजी सोशल मीडियावरही व्यक्त केली. या नाराजीबाबत नाविकसेनेचे अध्यक्ष राहुल गोडसे यांच्याशीही आपली चर्चा झाल्याची माहिती ठोसर यांनी दिली.वरिष्ठांच्या आदेशानुसारच कार्यवाहीस्थानिक पातळीवर पदांचे वाटप केलेले नाही. वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांच्या विविध पदांवर नियुक्त्या केल्या आहेत. पदांचे वाटप झाल्यानंतर प्रत्येक पक्षात नाराजीचा सूर उमटतच असतो, पण आमच्याकडून नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मनसे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.तेव्हाही पदाधिकारी झाले नाराज : रस्त्यांच्या दुर्दशेप्रकरणी एमआयडीसीत मनसेने मार्चमध्ये केलेल्या आंदोलनात स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. तेव्ही संबंधितांमध्ये नाराजी होती. आता पुन्हा पदांच्या वाटपावरून बेबनाव निर्माण झाला आहे. हे सर्वजण प्रभाग क्रमांक ८५, एमआयडीसी प्रभागातील आजीमाजी पदाधिकारी आहेत.