डोंबिवली - कोविड 19च्या महामारीमध्ये जनतेच्या सुरक्षेची व कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी महाराष्ट्रपोलिसांवर आहे पण ही जबाबदारी पार पाडत असताना पोलिसांचे संख्याबळ अपुरे पडताना दिसत असून त्यासाठी सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना विनाअट सेवेत रुजू करून घेण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देशमुख यांची नुकतीच भेट घेत पोलीस सेवेतील कुटुंबियांच्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. त्या संघटनेचे डोंबिवलीतील पदाधिकारी सागर मोहिते यांनी माध्यमांना बुधवारी ही माहिती दिली.
महाराष्ट्र पोलीस भरती 2018 यातील प्रतिक्षित यादीतील उमेदवारांना तात्काळ भरती करून घ्यावे, इतर सेवानिवृत्त होणाऱ्या वा स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला तात्काळ रुजू करून घ्यावे या मुद्यांवर चर्चेदरम्यान बोलणे झाले. जे पोलीस कर्तव्यावर सेवेत असताना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांचा निधी कधी मिळणार आहे. राज्यात आतापर्यंत शेकडो पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना तो निधी लवकर देण्यात यावा असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या पाल्यांना ही पोलीस पाल्य म्हणून विशेष आरक्षण द्यावे किमान एक पोलीस पाल्याला सेवेमध्ये अनुकंपा तत्त्वावर घेण्यात यावे, सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना विनामूल्य वैद्यकीय सेवा मिळाव्यात व विशेष करून सांगण्यात आले की जे काही युवक या मागण्या अंतर्गत भरती केले जाते ते सर्व युवक एक वर्ष विना वेतन सेवा करण्यास तयार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. त्या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही देण्यात आली. त्यावेळी संघटनेचे उमेश भारती, सागर मोहिते, योगेश झगडे, विक्रांत बेंद्रे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
"कोरोनाच्या काळात मोदी सरकारचा 'खयाली पुलाव', संकटातील 'संधी'", राहुल गांधींचा हल्लाबोल
CoronaVirus News : 1 ऑक्टोबरपासून देशभरात चित्रपटगृह सुरू होणार?, जाणून घ्या 'त्या' मागचं सत्य
"सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?"