Vidhan Sabha 2019: युती, आघाडीवर लढतीचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 01:01 AM2019-09-23T01:01:03+5:302019-09-23T01:01:46+5:30

जागावाटपाकडे लक्ष; उमेदवारीसाठी पक्षांतर्गत स्पर्धा जोरात

Maharashtra Vidhan Sabha 2019 Alliance, leading mathematics | Vidhan Sabha 2019: युती, आघाडीवर लढतीचे गणित

Vidhan Sabha 2019: युती, आघाडीवर लढतीचे गणित

Next

- प्रशांत माने 

कल्याण : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय नजरा आता युती आणि आघाडीच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. शिवसेना, भाजपची युती होईल, असा दावा केला जात असला तरी, दुसरीकडे आघाडी घोषित होऊनही काँग्रेस, राष्ट्रवादीचे जागावाटप जाहीर झालेले नाही. स्वबळावर लढण्याचा सूर सेना, भाजपमध्ये स्थानिक पातळीवर असताना, जागावाटपात कुणाच्या वाट्याला कोणता मतदारसंघ येतो, याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील इच्छुकांचे लक्ष लागले आहे. तूर्तास, उमेदवारी मिळण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची स्पर्धा तीव्र आहे. या सर्व घडामोडी पाहता युती आणि आघाडीच्या जागावाटपाबाबत पक्षनेतृत्व काय निर्णय घेतात, यावरच कल्याण, डोंबिवली परिसरातील चारही मतदारसंघांच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी आणि अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आटोपल्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी केवळ १२ दिवस मिळणार आहेत. तूर्तास युती आणि आघाडीचे दावे दोन्हीकडच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सुरू आहेत. परंतु, युतीची घोषणा जागावाटपासाठी अडली असून, आघाडीची घोषणा झाली, तरी जागांचे वाटप अद्याप झालेले नाही. विशेष बाब म्हणजे, युती आणि आघाडीचे दावे केले जात असले तरी, सर्व पक्षांनी सर्वच मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन ठेवल्या आहेत, हेदेखील विसरून चालणार नाही.

२००९ च्या निवडणुकीत युती आणि आघाडी झाली होती. परंतु, कल्याण पश्चिम मतदारसंघात पक्षांतर्गत स्पर्धा आणि मित्रपक्षातील पदाधिकाऱ्याने केलेली बंडखोरी शिवसेनेला विजय संपादन करण्यात आडकाठी ठरली होती. यंदाही या मतदारसंघात उमेदवारीसाठी पक्षांतर्गत स्पर्धा जोमात असून शिवसेनेच्या तब्बल ११ जणांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत. युती झाल्यास हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात यावा, अशीही मागणी आता होत असल्याने २००९ मधील लढतीचे चित्र पुन्हा दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीणमध्येही उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर्गत स्पर्धा पाहायला मिळत असून, काहींनी तर उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच ग्रामीण मतदारसंघात कार्यालये उघडून प्रचाराला सुरुवातही केली आहे. कल्याण पूर्वेतील उमेदवार स्थानिक असावा, अशीही मागणी नेतृत्वाक डे लावून धरण्यात आली आहे. शिवसेनेप्रमाणे भाजपमध्येही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. चार मतदारसंघांसाठी २२ जणांनी मुलाखती दिल्या आहेत.

राष्ट्रवादीचा दोन जागांवर दावा, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
आघाडीचा आढावा घेता, २००९ साली आघाडीमध्ये चारही मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेले होते. २०१४ मध्ये आघाडी न होता काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढले होते. दरम्यान, आता चारपैकी दोन जागा मिळाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली गेली आहे. त्याला काँग्रेसकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडेही लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या असून, त्यांची पहिली यादी २० सप्टेंबरला घोषित होईल, असे सांगितले जात होते.

परंतु, एमआयएमशी युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे यादी तूर्तास लांबणीवर पडल्याची सूत्रांची माहिती आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून निवडणूक लढवण्याचे संकेत मिळाल्याने स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. परंतु, युती आणि आघाडीच्या समीकरणाकडे मनसेसह वंचित बहुजन आघाडीचे लक्ष लागून आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Alliance, leading mathematics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.