अंबरनाथ : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघासाठी तयार करण्यात आलेल्या कोअर कमिटीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेत अंबरनाथच्या जागेवर पुन्हा एकदा दावा केला आहे. अधिक आक्रमक भूमिका घेत उमेदवारी न मिळाल्यास शिवसेनेचे काम करणार नाही, असे जाहीर करून टाकले आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे अंबरनाथमध्ये युतीत आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. तर, भाजपच्या या भूमिकेनंतर शिवसेनेने मात्र सावध भूमिका घेतली आहे. तसेच युतीचा धर्म हा पाळावाच लागेल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या वतीने आली आहे.अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व असून या वर्चस्वाला आव्हान देण्याचे काम विरोधकांनी नव्हे, तर खुद्द मित्रपक्ष असलेल्या भाजपानेच केले आहे. अंबरनाथची जागा भाजपला मिळावी, अशी सातत्याने मागणी केली जात आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या कोअर कमिटीने आता अधिकृत पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा या मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. गेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेना यांच्यात लढत झाली होती. या लढतीत भाजप मोजक्याच मतांनी पराभूत झाली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या वतीने या मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे.कोअर कमिटीचे पूर्णिमा कबरे, किसन तारमळे, तुळशीराम चौधरी, भरत फुलोरे आणि कृष्णा रसाळ यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. युतीचा धर्म असला तरी ही जागा भाजपला न सुटल्यास भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेचे काम करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. लोकसभेत पालघरचा ज्या पद्धतीने निर्णय झाला, त्यानुसार अंबरनाथमध्ये निर्णय घेतला तरी आम्हाला हरकत नाही, असे ते म्हणाले.ही जागा भाजपला मिळाल्यास उमेदवार कुणीही असला, तरी आम्ही एकदिलाने काम करू, अशी भूमिका त्यांनी घेतली. इतकेच नव्हे तर भाजपला ही जागा सोडणे शक्य नसेल, तर या जागेवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचीही आमची तयारी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.भाजपने वरिष्ठांकडे मागणी करावीयासंदर्भात शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, मागणी करण्याचा अधिकार त्यांचा आहे. मात्र, वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयानुसार आम्हाला काम करावे लागेल. युतीचा धर्म पाळण्यात आम्ही कमी पडणार नाही. ही जागा शिवसेनेची आहे, ती सेनेलाच राहील, हा ठाम विश्वास आम्हाला आहे. यासंदर्भातील निर्णय वरिष्ठ नेते घेतील. आम्ही केवळ काम करणारे पदाधिकारी आहोत. राहिला प्रश्न भाजपच्या मागणीच्या बाबतीत, तर त्यांनी या जागेची मागणी वरिष्ठांकडे करावी. उगीच पत्रकारांकडे मागणी करून विषय वाढविण्याचा प्रयत्न करू नये.
Vidhan Sabha 2019: अंबरनाथ मतदारसंघ भाजपलाच हवा; शिवसेनेवर दबावतंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 1:11 AM