- सदानंद नाईक उल्हासनगर : महापौरपदाप्रमाणेच विधानसभेच्या उमेदवारीबाबत झुलवत ठेवून कलानी कुटुंबाच्या राजकीय कोंडीचे प्रयत्न भाजप नेत्यांनी सुरू केल्याने त्यांच्या समर्थकांत अस्वस्थता पसरली आहे. भाजपचे माजी आमदार कुमार आयलानी यांना बळ देत एकगठ्ठा सिंधी राजकारणाला खीळ घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याने त्या समाजातील नाराजी सोशल मीडियावरून व्यक्त होऊ लागली आहे.एकेकाळी उल्हासनगरवर अनिर्बंध सत्ता गाजवणारे पप्पू कलानी तुरुंगात गेल्यावर त्यांच्या पत्नी ज्योती राजकारणात आल्या. सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष असल्या, तरी मुलगा ओमी याने भाजपची वाट धरल्यापासून त्या पक्षापासून फटकून आहेत. यंदा त्या रिंगणात उतरणार नसल्याने पक्षाने पालिकेतील गटनेते भरत गंगोत्री यांना संधी दिली.त्याच वेळी भाजपचे माजी आमदार कुमार आयलानी आणि महापालिका निवडणुकीपूर्वी त्या पक्षात गेलेला पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी यांच्यात विधानसभेसाठी प्रचंड स्पर्धा आहे. ओमी कलांनी यांचे व्यक्तिमत्त्व वादग्रस्त असल्याने उमेदवारीचा वाद चिघळू नये म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याऐवजी त्यांची पत्नी विद्यमान महापौर पंचम कलानी यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले आहे.ज्योती यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला असला, तरी आमच्या कुटुंबापैकी एक जण विधानसभेच्या रिंगणात असेल, असे वक्तव्य त्यांनी जाहीरपणे केल्याने भाजपने संधी न दिल्यास ओमी बंडखोरी करतील, अशी चर्चा रंगली आहे.याच गोंधळात शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागत प्रचार सुरू केला आहे. शिवसैनिकांनी ‘भावी आमदार’ असा उल्लेख करत सोशल युतीत ही जागा भाजपला सोडली नसल्याचे दाखवून दिले आहे. युतीचा भाग असलेल्या रिपाइंचे गटनेते व शहराध्यक्ष भगवान भालेराव यांनीही गेल्या आठवड्यात पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन प्रचारास सुरुवात केली. महायुतीत ही जागा रिपाइंला मिळेल, असा दावा भालेराव यांनी केला, तर वंचित आघाडीकडून सुधीर बागुल यांच्या नावाची चर्चा आहे.समर्थकांच्या हाती फक्त नाराजी!ओमी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्या टीमला उमेदवारी देताना भाजप नेत्यांनी चलाखीने त्यांना कमळ चिन्ह दिले. त्यामुळे सध्या आयलानींविरुद्ध नाराजी व्यक्त करण्यापलीकडे त्यांच्या हाती काही उरलेले नाही. त्यामुळे आपले नगरसेवक असूनही आपल्यासोबत नाहीत. आई रिंगणाबाहेर आणि मुलाला भाजपने उमेदवारी नाकारली, तर संपूर्ण कलानी कुटुंब विधानसभेच्या राजकारणाबाहेर जाईल, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
Vidhan Sabha 2019: उल्हासनगरात कलानींच्या कोंडीचे भाजपकडून प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 3:45 AM