ठाणे : युतीत आणि सत्तेत असतानाही रिपाइंला सन्मानाचा वाटा मिळत नाही, ही कार्यकर्त्यांची खंत आहे. भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत लेखी करार होऊनही भाजपने शब्द पाळला नाही. रिपाइंला सत्तेत १० टक्के वाटा दिला नाही. यंदा भाजप-सेनेची युती झाल्यास पक्षाला २३ जागा आणि युती झाली नाही तर ५० जागा देण्याची मागणी करून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील १० जागांवरही रिपाइं पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारशिंग यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दावा केला.रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने भाजपसोबत युती केल्याने भाजपला मागासवर्गीयांजवळ जाण्याची संधी मिळाली आहे. देशभरातील मागासवर्गीयांचे पक्ष भाजपजवळ जात आहेत. आठवले भाजपसोबत गेल्यानंतर मागासवर्गीयांचे नेते रामविलास पासवान, धनगरांचे नेते महादेव जानकर आदी भाजपसोबत आले आहेत. त्यामुळे भाजपने रिपाइंला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, असे सांगून बारशिंग यांनी राज्यात २३ जागांची मागणी केली.सेना-भाजप युती झाली नाही तर, भाजपने रिपाइंला ५० जागा सोडाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. भाजपसोबत लेखी करार झाला असतानाही, तो करार पाळत नाहीत, याची खंत वाटत असल्याचेही ते म्हणाले.बुधवारी सायंकाळी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे, नवी मुंबई अध्यक्ष सिद्राम ओहोळ, भिवंडी अध्यक्ष महेंद्र गायकवाड, बाळाराम गायकवाड, महिला आघाडीच्या मनीषा करलाद, आदी मान्यवर उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, ऐरोली आदी जागांवर रिपाइंने दावा केला आहे. नालासोपारा मतदारसंघाचीही जागा या पक्षाने मागितली आहे.
Vidhan Sabha 2019: भाजपने शब्द पाळत रिपाइंना सत्तेत १0 टक्के वाटा द्यावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 6:01 AM