- पंकज पाटीलअंविधानसभा मतदारसंघ हा कायम शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे. मात्र गेल्या विधानसभेत युती तुटल्याने शिवसेना आणि भाजप यांना स्वतंत्र निवडणूक लढवावी लागली. या निवडणुकीत लढत जोरदार झाली. मात्र विजय हा शिवसेनेचाच झाला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युती निश्चित मानली जात असल्याने ही जागा शिवसेनेलाच जाईल हे उघड आहे. मात्र भाजपचे स्थानिक पुढारी शिवसेनेच्या विरोधात जाऊन उमेदवारीचा दावा करीत आहेत. भाजपच्या या भूमिकेमुळे शिवसेनेचा आमदार असतांनाही उमेदवारीसाठी चर्चा मात्र भाजपची होतांना दिसत आहे.अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात सलग दोन वेळा शिवसेनेचे डॉ. बालाज किणीकर यांचा विजय झाला आहे. पक्ष त्यांनाच पुन्हा संधी देणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र असे असतांनाही भाजप अंबरनाथसाठी जोर लावत आहे. गेल्या निवडणुकीतील काँटे ेकी टक्करचा संदर्भ देत अंबरनाथवर दावा केला आहे. अर्थात भाजपचा हा दावा पक्ष श्रेष्ठीकडे कमी पत्रकारांकडे जास्त केला जात आहे.पत्रकार परिषदेत आग ओकणारे स्थानिक पुढारी वैयक्तिक गप्पांमध्ये युतीचा धर्म पाळावाच लागेल अशी भूमिका मांडत आहेत. अंबरनाथ विधानसभेची कोअर कमिटी उमेदवारीचा आपला दावा अद्याप धरुन आहे. भाजपकडे भक्कम उमेदवार नसला तरी इच्छुकांची संख्या कमी नाही. त्यातच गेल्या वर्षभरापासून उमेदवारीसाठी काम करणारे सुमेध भवार यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी फिल्डींग लावली आहे. जागा सुटली तर उमेदवारी त्यांना मिळेल असे निश्चित मानले जात आहे.मात्र जागाच सुटली नाही तर भवार यांच्यावरही पक्षादेश बंधनकारक असेल. भाजपची मंडळी ज्या पद्धतीने केवळ मीडियाकडे दावे करीत आहे ते पाहता ठिकठिकाणी शिवसेनेवरील दबाव वाढवण्याची ही भाजपची खेळी असावी. जागावाटपात शिवसेनेनी नमते घ्यावे याकरिता भाजपने ही खेळी खेळली असावी.उमेदवारीवरील दाव्याच्या नादात अंबरनाथची भाजप आपली ताकद शिवसेनेला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र शिवसेनेत सारे आलबेल नाही. त्यांच्यातील अंतर्गत नाराजीमुळे भाजपला ठोस उत्तर दिले जात नाही. वरिष्ठ पातळीवर शिवसेना आणि भाजप जमवून घेत असली तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांच्या विरोधात बोलतांना दिसतात.शिवसेनेकरिता भाजपची वाढती ताकद हीच अडचणीचा मुद्दा ठरत आहे. परंतु भाजपला रोखण्यासाठी कोणतीच व्यूहरचना शिवसेनेकडे दिसत नाही. परिणामी भाजपचे स्थानिक नेते शिवसेनेला उघडपणे आव्हान देत आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत युती झाली तरी स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली दरी त्रासदायक ठरु शकते. सध्या विरोधक इतके दुर्बळ झाले आहेत की, राज्यातील सत्ताधारी पक्षातील सुंदोपसुंदीचा ते फायदा उठवू शकत नाहीत.युतीचा धर्म पाळण्याची वेळ आल्यावर शिवसेना उमेदवाराकडून योग्य मान मिळावा यासाठी भाजपचे पदाधिकारी विरोधाची भूमिका घेऊन दबाव वाढवत आहेत. राज्यात ठिकठिकाणी शिवसेना, भाजपमध्ये एकमेकांची ताकद जोखण्याची चुरस सुरु असल्याने अंबरनाथ हेही त्यास अपवाद नाही.
Vidhan sabha 2019 : एकमेकांना जोखण्याची युतीमध्ये लागली स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 12:48 AM