ठाणे : विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराला २८ लाखांपर्यंत खर्च करण्याची अनुमती आहे. या मर्यादेतच निवडणूक खर्च करावा तसेच निवडणूक खर्चाची माहिती विहित मुदतीमध्ये निवडणूक यंत्रणेकडे द्यावी. अन्यथा, जिंकून आलेला उमेदवारही अपात्र ठरू शकतो. तसेच त्याला तीन वर्षांपर्यंत निवडणूक लढविण्यालाही प्रतिबंध येऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी मुदतीत आणि दिलेल्या वेळेतच निवडणूक विभागाकडे खर्चाची माहिती देण्याचे आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात झालेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते.निवडणुकीसाठी २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रि या सुरू होणार आहे. त्यामुळे निवडणुकीत होणाऱ्या खर्चाचा लेखाजोखा उमेदवारांना जिल्हा निवडणूक विभागास देणे बंधनकारक आहे. प्रत्येक उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केल्यापासून प्रतिदिवसाचा खर्च दिलेल्या नमुन्यामध्ये नोंदून ठेवायचा आहे. उमेदवाराला निवडणुकीसाठी २८ लाखांच्या खर्चाची मर्यादा आहे. प्रत्येक उमेदवाराने निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे. उमेदवाराने ते नामनिर्देशनापूर्वी उघडणे आवश्यक असून त्याचा क्र मांक नामनिर्देशन भरताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यायचा आहे. तसेच निवडणूकविषयक सर्व खर्च याच खात्यातून करणेही अपेक्षित आहे.उमेदवाराकडून कोणत्याही एका व्यक्तीस अथवा संस्थेस निवडणूक प्रक्रि येदरम्यान देय रक्कम १० हजारांपेक्षा अधिक असल्यास धनादेश अथवा धनाकर्ष किंवा बँक ट्रान्सफरनेच करता येणार आहे. उमेदवारांनी निवडणूक खर्चासाठी आलेल्या सर्व रकमा या खात्यात जमा करणे आणि सर्व निवडणूक खर्च त्याच खात्यातून करणे अपेक्षित आहे. उमेदवार जी रक्कम रोखीने खर्च करणार आहे, ती रक्कम प्रथम बँकेतून काढणे आवश्यक आहे. रोखीने केलेल्या व्यवहाराची नोंद उमेदवाराच्या बँक नोंदवही तसेच रोख नोंदवहीमध्ये घेणे आवश्यक आहे. जर उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत खर्चाचा तपशील सादर न केल्यास तीन वर्षांसाठी संबंधित उमेदवार निवडणूक लढवण्यास अपात्र ठरू शकतो.खर्च निवडणूक निरीक्षकांची करण्यात आली नियुक्तीउमेदवाराच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यातील १८ मतदारसंघांसाठी सहा खर्च निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. तीन विधानसभा मतदारसंघासाठी एक याप्रमाणे सहा खर्च निवडणूक निरीक्षक काम पाहणार आहेत. यामध्ये विवेकानंद यांची १३४-भिवंडी ग्रामीण, १३६-भिवंडी पश्चिम आणि १३७-भिवंडी पूर्वसाठी नियुक्ती झाली आहे. तर, आशीष चंद्र मोहंती यांची १३५- शहापूर, १३८-कल्याण पश्चिम आणि १३९-मुरबाडच्या निरीक्षकपदी नियुक्ती आहे. एस.आर. कौशिक यांची १४०-अंबरनाथ, १४१-उल्हासनगर आणि १४२-कल्याण (पूर्व) या तीन मतदारसंघांसाठी नियुक्ती असून शिवस्वरूप सिंग यांची १४३-डोंबिवली, १४४- कल्याण ग्रामीण आणि १४८- ठाणे या मतदारसंघासाठी नियुक्ती आहे. याशिवाय, उमेश पाठक १४५- मीरा-भार्इंदर, १४६-ओवळा-माजिवडा आणि १४७- कोपरी- पाचपाखाडी, तर के. रमेश यांची १४९-मुंब्रा-कळवा, १५०-ऐरोली आणि १५१-बेलापूर या मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.खर्चाच्या नोंदीसाठी छायानोंदवहीजिल्हा निवडणूक यंत्रणेकडूनसुद्धा प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाची छायानोंदवही (शॅडो रजिस्टर) तयार केली जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही नोंदींमध्ये तफावत नसावी. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या सर्व खर्चाच्या नोंदी अचूकपणे निवडणूक यंत्रणेला सादर कराव्यात. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी खर्चाची माहिती वेळोवेळी निवडणूक यंत्रणेला सादर करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.निवडणूक निकालानंतर एक महिन्यातच खर्च निरीक्षकांकडून उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यात उमेदवारांनी दिलेल्या खर्चाचा तपशील काटेकोरपणे तपासला जाईल. त्यात जर तफावत आढळली, तर संबंधित उमेदवाराला आधी नोटीस बजावली जाईल. त्याने त्याचा योग्य तपशील न दिल्यास मात्र त्याच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. शिवाय, तो तीन वर्षे निवडणूक लढविण्यासही अपात्र ठरू शकतो.- राजेश नार्वेकर, जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे
Vidhan Sabha 2019: खर्चाचा तपशील दिला नाही तर आमदारकी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:22 AM