कल्याण : भाजपने कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने नाराज झालेले आ. नरेंद्र पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या समर्थनार्थ पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामे दिले आहेत. मात्र पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भेटीच्या निमंत्रणाची प्रतीक्षा आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे पवार यांची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून त्यांचे बंड शमवण्याकरिता प्रयत्नशील असल्याचे समजते.आपण ४ आॅक्टोबर रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असे पवार यांनी सांगितले. मात्र त्याचवेळी त्यांची पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा सुरू आहे. मतदारसंघ मित्रपक्षाला सुटल्यामुळे बंडखोरी करुन निवडणूक लढवायची की, अन्य काही पदरात पाडून घेण्याकरिता सामोपचाराची भूमिका घेऊन वाटाघाटी करायच्या, अशा वैचारिक द्वंदात सध्या पवार आहेत.पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी जनसंकल्प मेळावा घेऊन, पवार यांच्या उमेदवारीबाबत पक्षाने बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत फेरविचार करावा, असा अल्टीमेटम दिला होता. त्यानुसार, पक्षाकडून काय निरोप येतो, याच्या प्रतीक्षेत कार्यकर्ते व पदाधिकारी होते.दुपारी १२ वाजता पवार यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले. तसेच, पक्षाकडून शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली जाऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हे पाऊल पक्षाविरोधात नसून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे पवार यांनी सांगितले.पक्षाकडून फेरबदलाचे संकेत आलेले नसले तरी, कोकण विभागाचे भाजपप्रमुख तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा झाली आहे. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही दूरध्वनी करुन चर्चा केली आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात चर्चेसाठी बोलावले असून, चर्चेअंती फेरविचार होऊ शकतो, असे पवार यांनी सांगितले.युतीच्या जागावाटपात भाजपचा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. मात्र, शिवसेनेच्या नेतृत्वाकडून बाहेरचा उमेदवार लादला जात असल्यास हा मतदारसंघ भाजपने परत घ्यावा, अशी भूमिका नरेंद्र पवार यांनी घेतली. पवार यांनी घेतलेला हा पवित्राच तिकडे शिवसेनेत उमेदवाराबाबत सायंकाळपर्यंत एकमत करण्यास कारणीभूत ठरला व शिवसेनेनी शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी देऊ केली.
Vidhan sabha 2019 : नरेंद्र पवार यांचे तळ्यातमळ्यात सुरू, बंडखोरीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 2:01 AM