- अजित मांडके ठाणे : नवरात्रीत शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत फैसला होणार आहे. परंतु, युती झाली किंवा नाही झाली तरी ठाण्यातील शिवसेना नेत्यांनी गेल्या नऊ महिन्यांपूर्वीपासूनच स्वबळाची तयारी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी भाजपचा आमदार आहे, त्या ठिकाणी शिवसेनेतील संभाव्य उमेदवारांची निश्चिती झाली आहे.भाजपवर कुरघोडी करण्यासाठी ठाण्यात शिवसेना सिद्ध आहे. युती तुटली तर जिल्ह्यातील शिवसेनेचे काही विद्यमान आमदार फुटण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसेनेच्याच सर्वेक्षणातून उघड झाली आहे. त्यामुळे एकीकडे स्वबळाची तयारी तर दुसरीकडे विद्यमान आमदारांना फुटण्यापासून रोखण्याचे आव्हान पक्षासमोर आहे.युतीबाबत शिवसेना आणि भाजपकडून अद्यापही फार्म्युला निश्चित झालेला नाही. त्यात काही जागांचा तिढा अद्यापही कायम आहे. शिवसेनेकडून ठाणे जिल्ह्याचा विचार केल्यास ठाणे शहर विधानसभा क्षेत्र मिळावे यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, युती तुटलीच तर या ठिकाणी शिवसेनेकडून उमेदवार कोण असेल ती नावे अंतिम झाल्याची माहिती आहे. युती झाली तरीही ही जागा मिळावी यासाठी शिवसेनेचे प्रयत्न असून त्या बदल्यात दोन वर्षांनी होणाऱ्या विधानपरिषदेची जागा सोडण्यास पक्ष तयार असल्याची माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. त्यामुळे भाजपने ठाणे शहरची जागा सोडल्यास विद्यमान आमदार संजय केळकर यांचे विधानपरिषदेवर पुनर्वसन केले जाऊ शकते, असे सेनेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.मागील वेळेस शिवसेना गाफील राहिल्याने, शिवसेनेला ऐन वेळेस स्वबळावर निवडणूक लढवून उमेदवारांची शोधाशोध करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती. त्यामुळे आताच्या निवडणुकीत पक्षातील प्रत्येक उच्चपदस्थ नेत्यांबरोबर सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही गाफील न राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मागील नऊ महिन्यांपासूनच विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु आहे. यासाठी काहींचा प्रवेशही लांबणीवर टाकला आहे. युती तुटली तर अशांना आपल्या पक्षात घेऊन त्यांनाच उमेदवारी देण्याची तयारीही जिल्ह्यातील काही मतदारसंघात सुरु आहे.शिवाय काही इच्छुकांना आधीपासूनच तयारी करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील काही मतदारसंघातील उमेदवार शिवसेनेकडून अंतिम झाले आहेत. परंतु, युती तुटली तरच त्यांची नावे घोषित केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या ठिकाणी जिल्ह्यात भाजपचा वरचष्मा आहे, त्याठिकाणी कुरघोडीचे राजकारण खेळण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. ठाण्यासह जिल्ह्यातील अशा काही मतदारसंघांत त्याचे पडसादही मागील काही महिन्यांत उमटल्याचे दिसून आले.संभाव्य फुटीमुळे पक्षश्रेष्ठी सावधयुती तुटली तर स्वबळाची तयारी शिवसेनेने केली असली तरी त्यांच्याच पक्षातील काही विद्यमान आमदार फुटण्याची शक्यताही त्यांना सतावत आहे. सध्या जिल्ह्यात शिवसेनेचे ६ आमदार आहेत, तर भाजपचे सात आणि एक अपक्ष असे आठ आमदार आहेत. त्यात युती तुटली तर शिवसेनेचे दोन आमदार वेगळा घरोबा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या दोघांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फारसे पटत नाही. मात्र जर ते फुटून भाजपातून निवडून आले तर शिवसेनेचा जिल्ह्यावरील वरचष्मा कमी होऊन भाजपचे जिल्ह्यात १० आणि शिवसेनेचे चार आमदार निवडून येण्याची चिंता पक्षाला सतावत आहे.
Vidhan Sabha 2019: शिवसेनेचे काही आमदार फुटण्याची शक्यता; पक्षाच्याच सर्वेक्षणातून माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 1:08 AM