- अनिकेत घमंडी डोंबिवली : केंद्रात भाजपची बहुमतांची दुसऱ्यांदा सत्ता आणण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा असल्याने आणि कल्याण-डोंबिवलीत संघ जास्तच प्रबळ असल्याने या दोन्ही शहरांतील भाजप, शिवसेना इतकेच नव्हे तर मनसेमधील इच्छुक संघ स्वयंसेवकांचा व ती विचारधारा मानणाºया मतदारांचा कल आपल्याला अनुकूल आहे किंवा कसे, याची चाचपणी करत आहेत.जनसंघापासून कल्याण जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. पूर्वीच्या ठाणे आणि आताच्या कल्याण मतदारसंघामध्ये आता डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम असे चार विधानसभा मतदारसंघ असून यामध्ये संघाची भूमिका खूप महत्त्वाची मानली जाते. त्या चारही मतदारसंघांपैकी डोंबिवली, कल्याण पश्चिम येथे भाजपचे वर्चस्व असून कल्याण पूर्वेत अपक्ष आमदारांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कुणाला मिळेल, याचा फैसला करताना संघाला कोणता उमेदवार मान्य आहे, याचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे संघाची मर्जी संपादन करण्याकरिता काही इच्छुकांची व विद्यमान आमदारांचीही धडपड सुरू आहे.लोकसभा निवडणुकीतही उमेदवार व इच्छुकांनी संघाच्या प्रमुख मंडळींच्या भेटीगाठी घेऊन आपल्याला संघाच्या स्थानिक मंडळींचा आशीर्वाद लाभेल, असे प्रयत्न केले होते. शिवसेनेच्या उमेदवारानेही युती असतानाही संघाच्या प्रमुख मंडळींकडे पायधूळ झाडली होती. कल्याण, डोंबिवलीत संघविचारांचा मतदार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अन्य पक्षातून लढणाºया उमेदवारांनाही काहीवेळा पाठिंबा देतो. वानगीदाखल उदाहरण द्यायचे तर आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसंत डावखरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली, तेव्हा संघाचा विचार मानणाºया मतदारांनी परांजपे यांना मते दिली होती. मात्र, त्यानंतर पक्षांतर केल्यावर आपल्याला आपल्या जातीमुळे संघाची मते मिळतील, ही परांजपे यांची अपेक्षा असतानाच शरद पवार यांनी थेट संघाचा उल्लेख ‘हाफचड्डीवाले’ असा केल्याने त्याचा फटका परांजपे यांना बसला होता, हा इतिहास आहे. त्यामुळे अगदी शिवसेना, मनसे अथवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून तिकीट मिळवण्यास इच्छुक असलेले काही विशिष्ट उमेदवार पक्ष न पाहता व्यक्ती म्हणून मतदारांनी आपला विचार करावा, याकरिता संघाची चाचपणी करीत आहेत. डोंबिवलीतील मनसेचे एक नेते हेही पक्षाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यावर संघ परिवारातील आपल्या सौहार्दपूर्ण संबंधाचा आपल्याला कसा लाभ होऊ शकेल, याची चाचपणी करीत असल्याचे बोलले जात आहे.कल्याण पश्चिमेत भाजपमधीलच इच्छुक संघामधील अंडरकरंटची चाचपणी करीत आहेत. कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये शहरी भागातील कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सुमारे १२ प्रभाग येतात. त्या ठिकाणी संघाचे असंख्य स्वयंसेवक राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातही इच्छुकांनी संघ स्वयंसेवकांच्या मानसिकतेचा कानोसा घेतला आहे.सुशिक्षित मतदार मोठ्या संख्येने असलेल्या या दोन्ही शहरांत व्हॉट्सअॅपवर विविध ज्ञाती, संस्था, आध्यात्मिक संस्थांचे सदस्य वगैरे यांचे ग्रुप आहेत. अशा ग्रुपवर शहरातील समस्या, त्या सोडवण्यात आलेल्या यशापयशाबाबतचा सूर, उमेदवार निवडीबाबत जनमत याचा कानोसा इच्छुक उमेदवार व विद्यमान आमदार घेत आहेत.नागरी समस्यांबाबत संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीयुती झाली नाही तर शिवसेना व भाजप दोन्ही पक्ष उमेदवार उभे करणार असून त्यादृष्टीने त्यांच्या पक्षानेही मुलाखती घेतल्या आहेत. ऐनवेळी उमेदवारी मिळाल्यावर धांदल उडू नये, यासाठी ही तयारी सुरू आहे. भाजपमधील इच्छुकांनी गणेशोत्सवात संघ स्वयंसेवकांच्या घरी जाऊन गणरायांबरोबर स्वयंसेवकांच्या आशीर्वादाची याचना केल्याचे समजते.संघाचे पदाधिकारी हे सध्या कल्याण-डोंबिवली परिसरातील खड्डे, वाहतूककोंडी, अस्वच्छता याबाबत नाराज असल्याचे काही इच्छुकांनी कबूल केले.
Vidhan Sabha 2019: संघाची ‘मन की बात’ जाणण्याची इच्छुकांची धडपड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 11:47 PM