Vidhan Sabha 2019: सेनेसाठी तीन पेपर कठीणच!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 01:59 AM2019-09-23T01:59:04+5:302019-09-23T01:59:32+5:30
गणित ठाण्यातील विधानसभा मतदारसंघांचे : कोपरी-पाचपाखाडीची परीक्षा सोपी
- अजित मांडके
ठाणे : लोकसभा निवडणुकीत शिवसेना, भाजपची युती झाली असली तरी, विधानसभा निवडणुकीसाठी युतीचा फॉर्म्युला अद्यापही अंतिम झालेला नाही. त्यामुळे ठाण्यात या दोन्ही पक्षांकडून स्वबळाच्या नाऱ्यावर अधिक जोर दिला जात आहे. शिवसेनेवर कुरघोडी करण्याची कोणतीही संधी भाजप सोडत नसल्याचे चित्र आहे. मात्र, तरीही हे दोघे वेगळे लढले तर, शिवसेनेला ठाण्याचा गड सर करण्याबरोबरच इतर मतदारसंघांवर आपली पकड मजबूत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. कोपरी-पाचपाखाडी या एकमेव मतदारसंघाचा पेपर शिवसेनेसाठी सोपा असणार असून, उर्वरित तीन मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेचा पेपर कठीणच असणार आहे.
ठाणे जिल्ह्याचा साधारण विचार केल्यास या ठिकाणी शिवसेना आणि भाजपचाच वरचष्मा असल्याचे २०१४ च्या निवडणुकीत दिसून आले होते. त्यावेळी हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले आणि काँग्रेस, राष्टÑवादीचा सफाया झाला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हे दोनही पक्ष युतीत लढले होते. त्याचा फायदाही तितकाच झाल्याचे दिसून आले. लोकसभेमध्ये शिवसेनेचे राजन विचारे यांचा तब्बल चार लाख १२ हजार मतांनी विजय झाला. या निकालामुळे शिवसेनेच्या मतांमध्ये भाजपमुळे वाढ झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले. त्यामुळेच आतादेखील युती झाली, तर याचा फायदा या दोन्ही पक्षांना होणार आहे. सध्या ठाण्याची जागा पुन्हा आपल्याला मिळावी, यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरूआहेत. दुसरीकडे भाजपकडून संजय केळकर यांचे नाव अंतिम मानले जात असले तरी, आणखी दमदार उमेदवार शोधण्याची मोहीमही भाजपमध्ये सुरूआहे. आता गणेश नाईकांमुळे भाजपची ताकद वाढली आहे. जिल्ह्याची सूत्रे भविष्यात त्यांच्याकडेच दिल्यास शिवसेनेला सुरुंग लागण्याची दाट शक्यता आहे.
मागील निवडणुकीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर यांना ७० हजार ८८४, तर शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांना ५८ हजार २९६ मते मिळाली होती. शिवसेनेचा गड मानल्या जाणाºया ठाणे शहर विधानसभा क्षेत्रावर भाजपने २९ वर्षांनंतर कमळ फुलविले होते. हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता. शिवसेनेचा पराभव होण्यामागे स्वपक्षातील मंडळी कारणीभूत होती. त्यानंतर पालिकेच्या निवडणुकीतही भाजपचा करिष्मा दिसून आला. या पट्ट्यातून भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढली आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या कमी झाली. आता हा गड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. युती झाली तरी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, युती झाली नाही तर हा गड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. या मतदारसंघातून नरेश म्हस्के, संजय भोईर आणि रवींद्र फाटक यांचे नाव पुढे आले आहे. महापौर मीनाक्षी शिंदे यांनीदेखील निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शविली आहे. त्यामुळे युती झाली नाही तर, यापैकी एक जण उमेदवार असणार हे निश्चित मानले जात आहे. त्याला टक्कर देण्यासाठी भाजपसुद्धा उमेदवार बदलू शकते, अशी शक्यताही व्यक्त होत आहे. भाजपमधून येथे संदीप लेले, मिलिंद पाटणकर, नारायण पवार, राजेश मढवी यांची नावे आघाडीवर आहेत. दुसरीकडे ओवळा-माजिवडा मतदारसंघाचा विचार केल्यास मागील निवडणुकीत शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांचा थोड्याफार मतांनी विजय झाला होता. सरनाईक यांना ६८ हजार ५७१ मते मिळाली होती. भाजपचे संजय पांडे यांना ५७ हजार ६६५ मते मिळाली होती. आता परिस्थिती बदलली असून शिवसेनेचे जे नगरसेवक सरनाईक यांच्या बाजूने होते, त्यांनीच आता या मतदारसंघातून दावा केला आहे. त्यामुळे सरनाईकांना स्वकीयांचेच कडवे आव्हान असणार आहे. त्यामुळे युती तुटली आणि सरनाईकांना पुन्हा संधी दिली तर, स्वकीयांमुळेच सरनाईकांचा पराभव होऊ शकतो, अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. याशिवाय, भाजपमधून अनेक दिग्गजांची नावे समोर आली आहेत. यामध्ये मनोहर डुंबरे, शिवाजी पाटील, मुकेश मोकाशी आदी महत्त्वाच्या नावांचा समावेश आहे. सरनाईकांना त्यांच्याच पक्षातील गटनेते दिलीप बारटक्के, नरेश मणेरा, मीनाक्षी शिंदे यांचे कडवे आव्हान असणार आहे.
कळवा-मुंब्रा मतदारसंघाचा किल्ला युतीसाठी अवघडच
कळवा-मुंब्रा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत राष्टÑवादीचे जितेंद्र आव्हाड यांना पाडण्यासाठी शिवसेनेकडून रणनीती आखण्यात आली होती. परंतु, ती अपयशी ठरली. या निवडणुकीत आव्हाड यांना ८६ हजार ५३३, तर शिवसेनेचे दशरथ पाटील यांना ३८ हजार ८५० मते मिळाली होती. यावेळीही आव्हाडांच्या मतांना ब्रेक लावणे सेना, भाजपला कठीण जाणार आहे.
यावेळीही एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार उभे करून मते फोडण्याचे राजकारण होणार आहे. शिवसेनेकडून इच्छुकांमध्ये राजेंद्र साप्ते, प्रदीप जंगम आणि अन्य एक नाव पुढे आले आहे. यात एकही मातब्बर उमेदवार नाही. परंतु, युती तुटली आणि भाजपने उमेदवार दिल्यास युतीच्या मतांमध्ये विभाजन होऊन त्याचा फायदा आव्हाडांनाच होणार आहे.
हा मतदारसंघ काबीज करण्याचे मोठे आव्हान शिवसेनेपुढे असणार आहे. कोपरी-पाचपाखाडी हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे युती झाली तरी आणि नाही झाली तरी, याचा परिणाम शिंदे यांच्या मतांवर होण्याची जराही शक्यता दिसत नाही. मागील निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना या मतदारसंघातून एक लाख ३१६ मते मिळाली होती.
भाजपचे संदीप लेले यांना ४८ हजार ४४७ मते मिळाली होती. आता युती झाली नाही तरी, भाजपकडून चर्चेतील नावे पुढे आली नाहीत. शिंदे यांच्याविरोधात शिवसेनेतूनही कुणी इच्छा व्यक्त केलेली नाही. त्यामुळे ठाण्यातील तीन पेपर शिवसेनेसाठी कठीण आणि केवळ कोपरी-पाचपाखाडीचा पेपर सोपा असणार, हे निश्चित मानले जात आहे.
मनसेचा फटका कुणाला?: मागील निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही मनसे आपले नशीब आजमावणार आहे. सध्या मनसेची या चार मतदारसंघांत आपली अशी एक लाखांच्या आसपास मते आहेत. ती मते पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी आणि इतर उमेदवारांना धक्के देण्यासाठी मनसेचे इंजीन धावणार आहे. ठाण्यातील चार मतदारसंघांतून मनसेकडून जवळपास उमेदवार निश्चित मानले जात आहेत. परंतु, त्यांचा किती प्रभाव पडेल आणि मनसे कोणाची मते फोडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातही शिवसेनेच्या मतांवर मनसेचा डोळा असणार, असे मानले जात आहे. त्यामुळे तसे झाल्यास शिवसेनेला ठाणे, ओवळा-माजिवडा आणि कोपरी-पाचपाखाडी या तीनही मतदारसंघांत कडवे आव्हान असणार आहे.
कसब लागणार
युती झाली तर चारपैकी तीन मतदारसंघ हे शिवसेना आणि भाजपकडे असतील आणि कळवा-मुंब्रा मतदारसंघ हा राष्टÑवादीकडेच राहील, असे चित्र आहे. मात्र, सध्या युतीमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीमुळे युती तुटली, तर शिवसेनेला ठाण्याचा गड सर करण्याबरोबरच ओवळा-माजिवडा आणि कळवा-मुंब्य्रातही आपले कसब दाखवावे लागणार आहे.