डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदारसंघासाठी भाजप, काँग्रेस, मनसेने उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. काँग्रेसने पहिल्यांदाच महिलेस उमेदवारी देत राधिका गुप्ते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर, महापालिकेतील मनसेचे गटनेते व नगरसेवक मंदार हळबे यांना पक्षाने उमेदवारी घोषित केली आहे.२०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात बहुरंगी लढत झाली होती. त्यावेळी मनसेचे हरिश्चंद्र पाटील यांना ११ हजार ९७८ हजार मते मिळाली होती. काँग्रेसचे संतोष केणे यांना सात हजार ४८ मते, राष्ट्रवादीचे विकास म्हात्रे यांना सहा हजार ३४६ मते, बसपचे दयानंद किरतकर यांना एक हजार ४९५ मते पडली होती. शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांना ३७ हजार ६४७ मते मिळाली होती. भाजपने दुसºयांदा चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. त्यांना ८३ हजार ८७२ मते पडली होती. ते ४६ हजार २२५ मताधिक्याने निवडून आले होते. हळबे हे २०१४ मध्ये मनसेतून इच्छुक होते. परंतु, भाजपमधून आलेले माजी आमदार हरिश्चंद्र पाटील यांना पक्षाने संधी दिली. यंदा काँग्रेसने राधिका गुप्ते यांच्या रूपाने पहिल्यांदाच महिला उमेदवार दिला आहे.दरम्यान, कल्याण पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण मतदारसंघांत दोन दिवसांतील घडामोडी विचारात घेता डोंबिवलीत शांतता होती. भाजपने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, त्यावेळी दोन अर्ज आले होते. त्यामुळे उमेदवार कोण असेल, हे चित्र जवळपास स्पष्ट होते. मनसेने बुधवारी उमेदवार जाहीर केला, तर काँग्रेसने मंगळवारी रात्री उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे या ठिकाणी तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अन्य ठिकाणांसारखी कुठेही नाराजी अथवा खदखद दिसून आली नाही.निकृष्ट रस्ते, उड्डाणपुलांची कामे, वीज आणि पाणी पुरवठ्यातील अडचणी, वाहतूककोंडी, फेरीवाल्यांचा प्रश्न, मनोरंजनाच्या साधनांचा अभाव, वाहनतळाची समस्या यासारख्या असुविधा या मतदारसंघांतील नागरिकांना भेडसावत आहेत. महापालिका या पायाभूत सुविधा पुरवण्यात कमी पडत असून, त्यासाठी निधीचा अभाव हे प्रमुख कारण पुढे येत आहे. प्रचारामध्ये हेच कळीचे मुद्दे ठरण्याची शक्यता आहे.
Vidhan sabha 2019 : डोंबिवली मतदारसंघात तिरंगी लढत? रवींद्र चव्हाणांना तिसऱ्यांदा संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 1:25 AM