कल्याण : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून कल्याण पूर्व मतदारसंघातही निवडणूक यंत्रणेच्या कार्यवाहीला वेग आला आहे. लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत येथे चार हजारांच्या संख्येने मतदार वाढले आहेत. ३१ आॅगस्टपर्यंत तीन लाख ४४ हजार ३६९ मतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती संबंधित विभागाने दिली आहे. दरम्यान, ४ आॅक्टोबरपर्यंत नोंदणीचा कार्यक्रम चालणार असल्याने मतदारांच्या संख्येत अधिक भर पडणार आहे.पूर्वीच्या कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन कल्याण पूर्व मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघाची हद्द कल्याण पूर्वचा भाग, अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंग, नेवाळीनाका या परिसरातील काही गावांसह उल्हासनगरमधील पाच प्रभाग अशी आहे. मतदारसंघाचे विभाजन झाल्यापासूनची ही तिसरी निवडणूक आहे. २०१४ च्या निवडणुकीत येथील मतदारांची संख्या तीन लाख ३३ हजार ९५८ इतकी होती. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत मतदारसंख्या तीन लाख ४० हजार ३०९ पर्यंत पोहोचली होती. आता आॅक्टोबरमध्ये होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३१ आॅगस्टपर्यंत राबविल्या गेलेल्या नोंदणी कार्यक्रमानंतर मतदारांची संख्या तीन लाख ४४ हजार ३६९ इतकी झाली आहे. यामध्ये एक लाख ८६ हजार ८१८ पुरुष, तर एक लाख ५७ हजार ३८६ महिला मतदार आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या या मतदारसंघात १६५ इतकी असून सेवा मतदारांची संख्या १३७ आहे. दिव्यांग आणि व्हीआयपी मतदारांची संख्या अनुक्रमे २१२ आणि २७ इतकी आहे.बॅनर काढण्यास सुरुवातक ल्याण पूर्व मतदारसंघात प्रामुख्याने केडीएमसीच्या ‘ड’, ‘जे’ आणि ‘आय’ अशा तीन प्रभाग क्षेत्रांचा समावेश होतो. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच येथे राजकीय पक्षांचे झेंडे व बॅनर काढण्याची कारवाई सुरू झाली आहे. मागील दोन दिवसांत झेंडे, बॅनर, पोस्टर, कमानी, भित्तीफलक, होर्डिंग्ज काढल्याची एकूण संख्या ३६५ इतकी आहे.
Vidhan Sabha 2019: कल्याण पूर्वेत वाढले चार हजार मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:41 PM