कल्याण : सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. इच्छुकांच्या मुलाखतींचा फार्स कसा सुरू आहे, तेच आता उघड झाले आहे. एक सामान्य कार्यकर्ता इच्छुक या नात्याने उमेदवारीची मुलाखत द्यायला गेला असता, त्याला पहिलाच प्रश्न ‘तुम्ही इच्छुक का आहात’, असा केला गेला. सर्वसामान्य कार्यकर्त्याने आमदारकीची निवडणूक लढवण्याचा साधा विचारही करायचा नाही का, असा सवाल त्यामुळे केला जात आहे.राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या पण सतत विरोधी पक्षाच्या आविर्भावात वावरत असलेल्या एका पक्षाने अलीकडेच इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. सामान्य कार्यकर्ता उत्साहाने इच्छुकांच्या रांगेत मुलाखत देण्यासाठी सामील झाला. मुलाखत घेण्याकरिता वरून धाडलेल्या एका नेत्याने ‘तुम्ही इच्छुक का आहात’, असा पहिलाच प्रश्न केला. सामान्य कार्यकर्त्याने फक्त पक्षाची कामे करून आंदोलनाच्या केसेस अंगावर घ्याव्या का, असा सवाल हा कार्यकर्ता करत आहे.नाव जाहीर न करण्याच्या अटीवर हा सामान्य कार्यकर्ता म्हणाला की, मुंबईत मुलाखती पार पडल्या. मुलाखत घेणारी व्यक्ती पक्षाची मातब्बर नेता होती. पहिला प्रश्न हतोत्साहित करणारा असल्याने हा कार्यकर्ता प्रथम गोंधळात पडला. तो म्हणाला की, मी ज्या मतदारसंघातून उमेदवारी मागत आहे, तो मतदारसंघ पक्षाचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात महापालिकेच्या १२२ जागांपैकी ३८ जागांचा समावेश होतो. यापैकी १७ जागा या आपल्या पक्षाच्या ताब्यात आहे.५० टक्के पक्षाचे प्राबल्य मतदारसंघावर आहे. मात्र, पक्षातील अंतर्गत कलहामुळे २००९ साली पक्षाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. मित्रपक्षाच्या बंडखोरीमुळे पक्ष पराभूत झाला. पुन्हा २०१४ सालच्या निवडणुकीत पक्षाच्या लोकांनी काम केले नाही. त्यामुळे मित्रपक्षाचा आमदार निवडून गेला. हा मतदारसंघ मित्रपक्षाकडे आहे. मात्र, बाल्लेकिल्ला आपल्या पक्षाचा असल्याने त्यावर आपण दावा सांगितला आहे.पक्षातील इच्छुकांपैकी एकाला उमेदवारी दिल्यास पक्षाचा विजय हमखास होऊ शकतो. त्यासाठी एक नामी युक्ती करावी लागेल. ती म्हणजे पक्षाच्या १७ नगरसेवकांकडून पक्षश्रेष्ठींनी मतदानापूर्वीच हमीपत्र घ्यावे. त्यांच्या प्रभागातून पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले नाही, तर निवडणुकीनंतर ते नगरसेवकपदाचा राजीनामा देतील. हे राजीनामे आधीच सहीनिशी पक्षाकडे असल्यास कारवाई करणे अधिक शक्य होईल.एक कार्यकर्त्याने उमेदवारी मागताना विजयासाठी सुचवलेला पर्याय ऐकल्यावर मुलाखत घेणाऱ्या नेत्याने तुमच्या या सूचनेचा जरूर विचार केला जाईल. तसेच तुमचादेखील विचार केला जाईल, असे मोघम आश्वासन दिले.मुलाखतीच्या सरतेशेवटी नेत्याने महत्त्वाचा प्रश्न विचारला की, निवडणुकीत तुम्ही खर्च किती करणार? आपल्यालाच उमेदवारी दिली जाईल, अशी शाश्वती दिसत नसल्याने एक कोटी रुपये खर्च करू, असे ठोकून दिले.त्यावर मुलाखत घेणाºया नेत्याने त्या सर्वसामान्य इच्छुकाकडे वरपासून खालपर्यंत पाहिले आणि किमान पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे खुणेने सांगितले.निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी पक्षाला आर्थिकदृष्ट्या तगडा उमेदवार अपेक्षित आहे, हे कार्यकर्त्याने ओळखले व काढता पाय घेतला.निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार निवडणे, हे निवडणुकीच्या प्रक्रियेतील सर्वाधिक महत्त्वाचे काम; मात्र याच कामात पक्षस्तरावर किती उदासीनता असते, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले.
Vidhan Sabha 2019: उमेदवार निवडीच्या मुलाखती कशा होतात?; सांगतोय एक सर्वसामान्य कार्यकर्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 1:02 AM