ठाणे : लोकसभा निवडणुकीत भिवंडीची जागा गमावल्यामुळे ठाणे जिल्ह्यात राजकीय संकटात सापडलेल्या भाजपने विधानसभेच्या नऊ जागा जिंकून ठाणे जिल्ह्यात शंभर टक्के यश प्राप्त करीत मोठा भाऊ होण्याचा मान मिळवला. मागील वेळी मीरा-भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांचा पराभव झाल्याने गमावलेली जागा यावेळी भाजपने जिंकून १८ पैकी नऊ जागा मिळवल्या. मागील वेळी जिंकलेल्या आठ जागा राखण्यात या पक्षाला यश प्राप्त झाले.
ठाणे जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद असले तरी जिल्ह्यात मोठा भाऊ भाजप हाच आहे. भविष्यातील महापालिकांमधील शिंदेसेनेच्या राजकारणाकरिता भाजपचा वाढता प्रभाव ही धोक्याची घंटा आहे.
कल्याण पूर्वेत शिंदेसेनेवर मातकल्याण पूर्वेतील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा शिंदेसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासोबत एका जमिनीवरून संघर्ष सुरू होता. त्यातून गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यात महेश यांच्यावर गोळीबार केल्याने महायुतीमधील दोन्ही पक्षात वितुष्ट आले होते. गणपत गायकवाड तुरुंगात असल्याने भाजपने त्यांच्या पत्नी सुलभा यांना उमेदवारी दिली. कल्याण पूर्वेत सुलभा यांचा सामना महेश गायकवाड यांच्याशीच झाला. अखेर सुलभा विजयी झाल्या. महेश हे दुसऱ्या स्थानावर राहिले तर उद्धवसेनेचे धनंजय बोडारे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.
मीरा-भाईंदरमध्ये नरेंद्र मेहतांचा विजयमागील निवडणुकीत मीरा-भाईंदर मतदारसंघात भाजपने मेहता यांना उमेदवारी दिली होती. मात्र भाजपच्याच गीता जैन यांनी अपक्ष अर्ज दाखल करून मेहता यांचा पराभव केला. जैन या भाजपच्या सहयोगी सदस्य झाल्या होत्या. यावेळी जैन यांना उमेदवारी नाकारून मेहता यांनाच भाजपने तिकीट दिले. मेहता यांनी जैन यांचा पराभव केला. याच अतिरिक्त जागेचा भाजपला जिल्ह्यात लाभ झाला.