ठाणे : महात्मा फुले हे केवळ एका समाजाची बांधीलकी घेऊन कार्य करणारे नेते नव्हते, सर्व समाजाची बांधीलकी मानणारे नेते होते असा महात्मा फुले यांच्या कार्याचा आलेख सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक, महाराष्ट्र फाऊंडेशन चा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त कार्यकर्ते आणि व्यासंगी बहुश्रुत वक्ते प्रा. हरी नरके यांनी श्रोत्यांसमोर उलगडून उभा केला.
साने गुरुजी वाचनालयाच्या वतीने 'स्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताम्हणे व्याख्यानमाला' आयोजित करण्यात आली होती. प्रा. हरी नरके यांचे " कमिशनर आणि उद्योगपती महात्मा फुले." या विषयावर व्याख्यान झाले. महात्मा फुले यांचा समग्र असा कर्तृत्वाचा परिचय त्यांनी करून दिला. फुले हे स्वतः उद्योगपती होते. मुंबईतमुंबई महानगरपालिका, मुंबईतील एका इंग्रजी वृत्तपत्राची इमारत त्यांच्या बांधकाम कंपनीने उभारलेल्या आहेत. पुण्यात बंडगार्डन समोरचा पूल, भंडारदरा धरण त्यांच्या कंपनीने बांधलेले आहे. गणेश उत्सव फुले यांनी सुरू केला होता, पुढे लोकमान्यांनी तो मोठा केला, हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. फुले यांनी केवळ शिक्षणाचे कार्य केले असे नाही. ते पुण्याच्या नगरपंचायतीचे कमिशनर ( नगरसेवक) होते. रस्ता रुंदीकरण, रस्त्यावर दिवे, बंद नळातून घरपोच पाणी पुरवठा, शेतकऱ्यांना रास्त हमीभाव, शेतकऱ्यांना कर्जमाफी, यासारखी अनेक कामे त्यांनी त्या काळात केली. 'खरा महात्मा ' असा त्यांचा उल्लेख स्वतः महात्मा गांधीजींनी केला, यातच सारे आले. सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक समेळ " मी अश्वत्थामा चिरंजीव" या विषयावर व्याख्यान झाले. अश्वत्थामा चिरंजीव आहे. आजही तो आहे. कधी त्याच्या जखमेवर घालण्यासाठी तेल मागायला दारात आला तर नाही म्हणू नका. द्रोणाचार्यांचा हा पुत्र सगळ्यात उंच आणि सर्व विद्या पारंगत होता. त्याच्या माथ्यावर रत्नमणी होता. परंतु शापाचा बळी ठरला आणि त्याच्या वाट्याला आयुष्यभराचे महाभारत जोडले गेले. या विषयाचा अभ्यास करण्यासाठी खूप वर्षांचा कालावधी गेला. धुळे, नंदुरबार, नर्मदा, हिमालय असा प्रवास करावा लागला. खूप परिश्रमपूर्वक हा ग्रंथ साकार केला आहे. समेळ यांनी व्याख्यानमालेत आपल्या ओघवत्या शैलीत आणि अभिनयाच्या अभिनिवेशात सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शेवटच्या दिवशी अॅड. संतोष भामरे, संविधान आणि आरक्षण या विषयावर आपले मत व्यक्त केले. या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन संस्थेचे कार्यवाह चांगदेव काळे यांनी केले. व्याख्यानमालेसाठी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानमालेमुळे चांगल्या वक्त्यांची उत्तम विचार ऐकायला मिळाले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.