ठाणे - उल्हासनगरमध्ये भाजपला खिंडार पाडल्यानंतर आता आगामी काळात ठाण्यासह पालघरमध्ये महाविकास आघाडी सर्वच निवडणुका एकत्रित लढविणार असल्याचा दावा राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तर काँग्रेसने केलेल्या दाव्याची देखील त्यांनी हवा काढली आहे.
बुधवारी उल्हासनगरमधील तब्बल २१ नगरसेवकांसह १९ माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशानंतर राष्ट्रवादीची जिल्ह्यात ताकद वाढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. परंतु दुसरीकडे आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढेल असे सांगून त्यांनी काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या स्वबळाच्या दाव्याची हवा काढली आहे. वरिष्ठ हे केवळ कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा म्हणून असा दावा करीत असतात, मात्र प्रत्यक्षात आम्ही एकत्रच निवडणूक लढवू असे त्यांनी स्पष्ट केले. नवीमुंबईत एक एक करुन आम्ही करिष्मा दाखविला आहे.
"भिवंडीतही राष्ट्रवादीच्या बाजूने कौल त्यामुळे जिल्ह्यात येत्या काळात मोठे बदल दिसतील"
भिवंडीतही राष्ट्रवादीच्या बाजूने कौल घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात येत्या काळात मोठे बदल दिसतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. एकीकडे ठाण्यात काँग्रेसचे पदाधिकारी कोणत्याही परिस्थितीत एकत्रित निवडणूक लढणार नसल्याचा दावा करीत आहेत. तसेच काही वरिष्ठांनी देखील तसा दावा केला होता. परंतु मागील आठवडय़ात महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला ज्या ज्या पातळीवर खाली आणायचे असेल त्या त्याठिकाणी महाविकास आघाडी एकत्र लढेल असे संकेत दिले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आव्हाड यांनी देखील तसेच संकेत दिल्याने आता आगामी काळात त्याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना ठाणेकरांनी अनुभवला
दरम्यान ठाण्यात मागील काही दिवसापासून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा लसीकरणावरुन वाद पेटल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेने कळव्यात लसीकरण घेऊन राष्ट्रवादीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. तर राष्ट्रवादीने देखील कोपरी पाचपाखाडी या शिवसेनेच्या मतदारसंघात लसीकरण उत्सव साजरा करण्याची परवानगी मागितली होती. यावरुन शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना ठाणेकरांनी अनुभवला होता. परंतु आता आव्हाडांनी केलेल्या दाव्याने हा वादही तात्पुरता होता का? अशी शंका मात्र निर्माण झाली आहे.