सदानंद नाईक, उल्हासनगर: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या शहर दौऱ्याने पक्षातील कार्यकर्त्यांत नवचैतन्य आले असून सिंधी समाजाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावून मार्गदर्शन केले. तसेच नेहरू चौकातील पक्षाच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उदघाटन करून शिवसेनेच्या संजय राऊत यांचा महाविकास आघाडी बंदोबस्त करणार असल्याचे संकेत दिले.
उल्हासनगर महापालिकेत यापूर्वी दोन वेळा काँग्रेसचा महापौर निवडून आला असून पक्षाचे आमदारही निवडून आले आहेत. दरम्यान पक्षातील गटतटामुळे शहर काँग्रेस खिळखिळी झाली असून महापालिकेत अंजली साळवे हया एकमेव नगरसेवक पदी निवडून आल्या आहेत. प्रथमच शहराध्यक्ष पदाची माळ बिगर सिंधी समाजाच्या रोहित साळवे यांच्या गळ्यात पडल्यावर, त्यांनी नाविन जुन्याना पक्षनेते व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पक्षाची ताकद वाढविण्याचे काम केले. साळवे यांच्या प्रयत्नातून पक्षाचे नेहरू भवन पक्ष कार्यालयाचे नूतनीकरण करून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते बुधवारी उदघाटन झाले. यावेळी माजीमंत्री नसीम खान, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रदेश सचिव मनोज शिंदे यांच्यासह शहर पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील धोकादायक इमारती, वाढलेली गुन्हेगारी, मुस्लिम दफनभूमी अश्या विभिन्न प्रश्नांवर व सामाजिक संघटने सोबत नाना पटोले यांनी शहर दौऱ्यात चर्चां केली. तसेच वाढती गुन्हेगारी व बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थे संबंधी उल्हासनगर परिमंडळ-४ चे उपायुक्त सुधाकर पठारे यांची भेट घेऊन चर्चा केली. स्वामी शांती प्रकाश हॉल येथे आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन केले. यावेळी अनेक तरुण व महिलांना पक्षात प्रवेश घेतला. शहराच्या प्रश्नांसाठी काँग्रेस नेहमीच झगडत राहील व कुठलीही तडजोड करणार नाही. तसेच पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद दिली जाईल. असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी दिले. पटोले यांच्या दौऱ्याने पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांत चैतन्य आल्याचे चित्र आहे. माजी शहराध्यक्ष डॉ जयराम लुल्ला, माजी महापौर हरदास माखिजा, मालती करोतीया, माजी उपमहापौर जया साधवानी, राधाचरण करोतीया, पक्षाच्या गटनेत्या अंजली साळवे, शहराध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.