ठाणे : शिवसेना कोणाची या मुद्द्यावर बुधवारी विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा निर्णय दिला. या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केल्यानंतर गुरुवारी ठाण्यात महाविकास आघाडीचे एक बॅनर झळकले आहे. त्या बॅनरवर जळजळीत प्रतिक्रियेसह अब न्याय जनता करेगी... असे नमूद केले आहे. या बॅनरबाजीने ठाण्यातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना कोणाची या मुद्द्यावर निकाल दिला. त्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून प्रतिक्रिया उमटल्या. एकीकडे जल्लोष दुसरीकडे निषेध असे चित्र पाहण्यास मिळाले. दरम्यान दोन गटाच्या मित्रपक्षांनी आपापली भूमिका मांडली. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी रात्री विमानतळावर आल्यावर त्यांचे दणक्यात स्वागत करण्यात आले. ठाणे आणि बॅनरबाजी ही गोष्ट काही नवीन नाही. नवीन वर्षाच्या शुभेच्छा... ही महाविकास आघाडीने ठाणेकरांना देताना, मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानच्या जवळील नाक्यावर बॅनर लावत डिवचण्याचा प्रयत्न केला होता. तद्पूर्वी ही शिवसेना शिंदे गट आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात बॅनर बाजी पाहण्यास मिळाली होती. त्यातच शिवसेना कुणाची या निकालानंतर ठाणे शहरात महाविकास आघाडीने आता बॅनर लावले आहेत. त्याच्यावर प्रतिक्रिया देत अब न्याय जनता करेगी म्हणटले आहे. तसेच त्या बॅनरवर फक्त महाविकास आघाडीच म्हटले आहे. अन्य कोणाचे नाव किंवा फोटो सुद्धा दिसत नसून बॅनरचा बॅकग्राऊंड पांढरा असून त्याच्या काळ्या रंगात प्रतिक्रिया नोंदविण्यात आलेली आहे. तसेच बॉर्डर लाल रंगाची दिसत आहे. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गट किंवा महायुती त्या बॅनरला काय उत्तर देते याकडे राजकीय मंडळींसह ठाणेकर नागरिकांचे लक्ष लागले आहे. बहुदा आता ठाण्यात फक्त बॅनरच बोलणार की काय असे दिसत आहे.
असा आहे बॅनरवरील मजकूर
"आज दिवसाढवळ्या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली, अन लोकांनी ती उघड्या डोळ्यांनी बघितली ! अब न्याय जनता करेगी...महाविकास आघाडी."