ठाण्यातही महाविकास आघाडीत ठिणगी; काँग्रेसनं सोडला सेना अन् राष्ट्रवादीवर 'बाण'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 02:36 PM2020-07-05T14:36:38+5:302020-07-05T14:37:09+5:30

एकीकडे राष्ट्रवादीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र देऊन आम्हालाही बैठकीला बोलवा, अशी मागणी करीत नाराजी व्यक्त केली.

Mahavikas front dispute in Thane; Congress critisize NCP and shivsena | ठाण्यातही महाविकास आघाडीत ठिणगी; काँग्रेसनं सोडला सेना अन् राष्ट्रवादीवर 'बाण'

ठाण्यातही महाविकास आघाडीत ठिणगी; काँग्रेसनं सोडला सेना अन् राष्ट्रवादीवर 'बाण'

Next

ठाणे  : मागील काही महिन्यांपासून राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी होत असून कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून न घेतल्याने कॉंग्रेस पक्ष नाराज होत असल्याचे चित्र आहे. तीच नाराजी आता ठाण्यातही उघडपणे  समोर येऊ लागली आहे. एकीकडे राष्ट्रवादीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र देऊन आम्हालाही बैठकीला बोलवा, अशी मागणी करीत नाराजी व्यक्त केली.

तर दुसरीकडे कॉंग्रेसने आता शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत आम्हाला दोघांपैकी कोण सामावून घेतो, असा सवाल उपस्थित केला आहे. कोविड रुग्णालयाचा शुभारंभ तुम्हीच करता, पालिकेत काही शहराच्या दृष्टिकोनातून बैठकी होतात, त्यावेळेसही आम्हाला डावलले जाते, असा धक्कादायक आरोपही कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कॉंग्रेसची नाराजी असून प्रत्येक ठिकाणी डावलले जात असल्याने वारंवार महाविकास आघाडीत ठिणगी पडत आहे.

ती ठिणगी आता ठाण्यातही पडू लागली आहे. राज्यात तर आम्हाला डावलले जातेच, परंतु ठाण्यातही आम्हाला डावलले जात असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त करीत थेट आदित्य ठाकरे यांना निवेदन देऊन ठाण्यात जर कोणी मंत्री येणार असेल तर त्याची माहिती आम्हाला दिली जात नाही, असा आक्षेप घेतला आहे, परंतु आता शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघेही आम्हाला डावलत असल्याने आम्ही कधी नाराजी व्यक्त केली का? उलट आम्ही महाविकास आघाडीचे घटक म्हणून एकत्रितपणे काम करण्याची इच्छा व्यक्त करीत होतो. परंतु आता आम्हाला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही. कॉंग्रेसला शिवसेना, राष्ट्रवादीकडून वारंवार डावलले जाते, ठाण्यात कॉंग्रेसला विचारतच घेतले जात नाही.

ज्या वेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित काम करीत होते, तेव्हाही आम्हाला कोणी विश्वासात घेतले का?, कोविड हॉस्पिटलचा शुभारंभ, शहराच्या विकासाच्या दृष्टीने कोणी आम्हाला विचारात घेतले नाही. आम्हीदेखील महाविकास आघाडीचाच घटक आहोत. आम्हालादेखील शहराची आणि येथील नागरिकांची काळजी आहे. परंतु वारंवार डावलून आमच्यावर हा अन्याय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यात कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांसह इतर मंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी होऊ लागली आहे. आता बिघाडीची ही ठिणगी ठाण्यात येऊन पोहोचली असून जाधव यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी आता तरी कॉंग्रेसला विश्वासात घेतील का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

Web Title: Mahavikas front dispute in Thane; Congress critisize NCP and shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.